नगर:
नगर मध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्री राणे यांना तुम्हांला काळे झेंडे दाखवले, असे विचारताच राणे माध्यमकर्मींवरच चांगलेच भडकले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले असा प्रश्न विचारल्याने संतापलेले नारायण राणे त्यानंतर “..जय हिंद जय महाराष्ट्र” म्हणत काढता पाय घेतला. विशेष म्हणजे आपल्याला काळे झेंडे दाखवलेच नाही, मला असे काही दिसलेच नाही, एव्हढी हिंमत नाही यायची असे राणे यांनी सांगत असा काही प्रकार झालाच नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
मुख्यालयाच्या बाहेर थांबलेल्या मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
-नगर तालुक्यातील अकोळनेर येथे सुक्ष्म, लघू ,मध्यम उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते काल शुक्रवारी करण्यात आले होते. त्यासाठी मंत्री राणे यांचे हेलिकॉप्टर दुपारी नगर येथील जिल्हा पोलीस मुख्यालय परेड ग्राउंडवर लँड झाले. त्यानंतर त्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी निघाला असता, तत्पूर्वीच मुख्यालय बाहेरील रस्त्यावर काळे झेंडे दाखवत निषेध करण्यासाठी थांबलेल्या मराठा कार्यकर्त्यांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शिल्पा गार्डन परिसरात काळे झेंडे आणि घोषणाबाजी..
-यानंतर पोलीस बंदोबस्तात मंत्री राणे यांचा ताफा पुढे निघाला असता शिल्पा गार्डन परिसरात उड्डाणपूलाच्या पुढे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची दुसरी टीम अचानक पणे रस्त्याच्या दुतर्फा आली आणि हातात काळे झेंडे राणे यांच्या ताफ्याला दाखवत जोरदार घोषबाजी सुरू झाली. कदाचित या दुसऱ्या “टीम”ची कल्पना पोलिसांनाही नसावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे गनिमी कावा करत काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन यशस्वी केल्याचे या ठिकाणी दिसून आले. ताफा पुढे जाई पर्यंत आणि गेल्यानंतरही मराठा समाजाचे कार्यकर्ते काळे झेंडे उंचावत घोषणाबाजी करत होते.
राणेंना म्हणाले काळे झेंडे दाखवलेच नाही!!
-अकोळनेर येथील कार्यक्रम आटोपल्यावर मंत्री नारायण राणे यांना न्यूज चॅनेल्सच्या प्रतिनिधींनी पहिलाच प्रश्न थेट मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याबद्दल विचारल्याने राणे लागलीच संतापले. आपणाला काळे झेंडे दाखवले असा प्रश्न करताच राणे यांनी, “मला नाही दाखवले..समोर या ना म्हणावं..कोणी दिसलं नाही आणि तुम्ही(मीडिया) टीव्ही वर फ्लॅश करता..हे चुकीचे होतेय..समोर या आणि मला दाखवा ना काळा रंग कसा असतो ते..एव्हढी हिंमत नाही यायची..” असे उत्तर काहीसे संतापूनच दिले. पुढे राणेंनी माध्यमकर्मींना उद्देशून, “तुम्हाला विकास हा विषय नाही..क्लश्टरचा परिणाम होईल त्याचे नाही..तुम्हांला फक्त काळे झेंडे.. जय हिंद जय महाराष्ट्र..” असे म्हणत राणे यांनी लगेच काढता पाय घेतला. माध्यमकर्मींना इतरही प्रश्न विचारायचे होते मात्र चिडलेले नारायण राणे निघून गेले.