नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..
एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांची मागणी..
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली घोडेपीर दर्गा पाडली; नागरिकांमध्ये संताप
अहिल्यानगर: नगर शहरात मध्यवर्ती भागामध्ये पटवर्धन चौक ते गांधी मैदान रस्त्यावर असलेल्या घोडे पीर दर्ग्याची रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने नगर शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून नागरिकात एकीकडे संताप व्यक्त होत असताना तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे याबाबत पोलिसांनी तीव्र दखल घेतली असून परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे स्थानिक पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्याबरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून शांतता राखण्याचे आवाहन केलेले आहे याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज आश्रफी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, “काही लोकांना अहमदनगर मध्ये दंगल घडवायची आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहे. रात्रीच्या अंधारात दर्ग्याच्या तोडफोड करणे याला मर्दानगी म्हणत नाही. असे काम षंढ संघटन करत असते. आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे त्यांनी आरोपीचा शोध लावावा तसेच याचे मुख्य सूत्रधार शोधून काढतील. या दर्ग्याला मानणारे मुस्लिम समाजापेक्षा जास्त हिंदू समाज आहे. आणि हेच या दर्ग्याच्या देखभाल करतात.” अशी प्रतिक्रिया घटनास्थळी भेट दिल्या नंतर डॉ.आश्रफी यांनी दिली आहे.
अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौक ते गांधी मैदान रोड मार्गावरील पुरातन घोडेपीर दर्गा आज 24 ऑगस्ट रोजी अज्ञात समाजकंटकांनी पहाटेच्या सुमारास जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळाची माहिती मिळताच तोफखाना व कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे आणि प्रताप दराडे तसेच शहराचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थळाची पाहणी करून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने पाडलेल्या दर्ग्याचे अवशेष उचलून नेले. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे. घोडेपीर दर्गा ही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखली जात होती. येथे हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असत. मात्र, दर्गा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गणेशोत्सव-ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर घटना!!
आता लवकरच सार्वजनिक गणेशोत्सव त्याचबरोबर ईद-ए-मिलाद हे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे सण येत असून या पार्श्वभूमीवर कालच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे तसेच जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषद घेत या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलेलं आहे. पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आला असून अनुचित प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील पुरातन अशी दर्गा याची तोडफोड झाल्याची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासना समोर शांतता आणि कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता बाळगा असे आवाहन केले आहे.