स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मदतीच्या आशा वाढल्या
अमित शहांच्या आश्वासनांची पूर्ती दिवाळी पूर्वी की दिवाळी नंतर याची आता प्रतीक्षा!!
राजेंद्र त्रिमुखे।विशेष।अहिल्यानगर: केंद्रीय गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणी-प्रवरानगर इथे विखे परिवाराच्या तसेच साईंचे दर्शन घेत कोपरगाव इथे कोल्हे परिवाराच्या कार्यक्रमास हजेरी लावत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बहाल झालेल्या बळीराजाला दिलासा देण्याचे आणि दुःखावर फुंकर घालण्याचे काम मदतीचे आश्वासन देत केले. अर्थात लवकरात लवकर मदत करताना हे सांगताना राज्य सरकार कडून सर्व अहवाल आल्यानंतर हे सांगण्यास ते विसरले नाहीत. दुसरीकडे राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागातील पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. दुर्गम,दुर्लक्षित छोट्या भागात वा घटकां पर्यंत तर तलाठी अजून पोहचलेले नाहीत. त्यातच परतीचा पाऊस आणि समुद्रात निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा याचा दणका अजून बसणार अशी अटकळ हवामान खात्याकडून व्यक्त केली जात असल्याने अजून काही दिवस अतिवृष्टीचे संकट राज्यावर असल्याने नव्याने पुन्हा अजून नुकसान होणार आणि त्यांचेही पंचनामे सरकारला करावे लागणार असल्याने अमित शहा म्हणाल्या प्रमाणे संपूर्ण अहवाल सरकार कधी पाठवणार याचे उत्तर आजतरी सांगता येण्यासारखे नाही. मुळात सरकारने आज पर्यंत ज्यांचे नुकसान झाले आणि जे अडचणीत आले आहेत त्यांना तात्पुरती मदत सुरू केली असली तरी ती पुरेशी नसल्याची टीका विरोधी पक्षांनी सुरू केली असून शेतकऱ्यांमध्येही या मदतीबद्दल नाराजी आहे. एकरी 50 ते 70 हजार मदतीची अपेक्षा आणि तशा घोषणेची किमान शेतकऱ्यांना अपेक्षा असून त्याची पूर्तता दिवाळी पूर्वी व्हावी अशीही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात दोन दिवस दौऱ्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात असताना आणि त्यांच्या सोबत दिमतीला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कार्यक्रमाचे सर्वेसर्वा राधाकृष्ण विखे, जवळपास निम्मे मंत्रिमंडळ उपस्थित असताना अमित शहा यांनी अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या साठी कोणतीही थेट मदतिची घोषणा न करता अहवाल आल्यावर केंद्र सरकार मदत करेल या अश्वासनावर बोळवण केली. विरोधी पक्षाने ओल्या दुष्काळाची मागणी केली असली तरी ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी धुडकावून लावली आहे. मात्र मदत त्या पद्धतीने भरीव करू असे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस दिल्लीत गेले, नंतर शिर्डीत आलेल्या अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विखे हे बंद दाराआड चर्चा करून बोलले यातून रविवारी मोदींच्या नंतर देशात महत्वाचे दोन नंबरचे निर्णय घेणारे मंत्री ओळखले जाणारे शहा निश्चितच अतिवृष्टीवर दिलासा देणारा निर्णय घोषित करतील अशी अपेक्षा उभ्या महाराष्ट्राला होती मात्र ती फोल ठरली. आता राज्याचा पूरपरिस्थितीचा आणि पंचनाम्याचा नुकसानीचा अहवाल ज्यावेळी जाईल त्यानंतर केंद्र सरकार मदत देईल असे आश्वासन शहा यांनी देत शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर मारत दौरा आटोपता घेतला आहे. मुळात हा दौरा पूर्व नियोजित होता तो विखे आणि कोल्हे यांच्या कार्यक्रमान साठी आणि शिर्डीत साईबाबां समाधी मंदिरात दर्शनासाठी. अमित शहा यांचा हा अहिल्यानगर अर्थात शिर्डी साठीचा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून आयोजित केलेला दुसरा दौरा होता. विखे परिवाराची खासियत हीच आहे की ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी त्यांनी जवळीक साधत हित साधत त्यांना साईबाबा दर्शन घडवत लोणी-प्रवरा परिसरात आणत विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी, पंतप्रधान स्व.मनमोहन सिंग आदींनी विखेंच्या आग्रहाला साद देत लोणी-प्रवरा पर्यटन केले आहे. देशभर कर्जमुक्तीचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रवानगर मध्ये आलेले मनमोहन सिंग यांच्या सभेत शिवसैनिकांनी मनमोहन सिंग भाषण करत असताना काळे झेंडे फडकवले होते आणि लागलीच केंद्राने देशपातळीवर कर्जमुक्ती घोषित केली होती. असे पुन्हा काही विरोध प्रदर्शन होऊ नये म्हणून की काय अमित शहा यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळीच उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक ठाकरे शिवसेनेच्या आणि मनसे सैनिकांना ताब्यात घेऊन थेट नगरला आणण्यात आले. अमित शहांचे कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना पुन्हा सोडण्यात आले. लोकशाहीत लोकशाही मार्गाने आंदोलन, विरोध करण्याचा मार्गच सत्ताधारी पक्ष बंद करणार असेल तर प्रश्न सुटणार कसे अशी प्रतिक्रिया यावर उमटत आहे. भाषणात एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्या अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार मधील लोकांनी सहकार क्षेत्र लुटून खाल्ले या आशयाचे वक्तव्य सहकारात आता पूर्वीची मक्तेदारी संपुष्टात आली असल्याचे वक्तव्य चक्क विखे आयोजक असलेल्या कार्यक्रमात केले. सहकार साखर कारखानदारीसह सहकाराच्या विविध शाखांत विखेंची चौथी पिढी आता कार्यरत आहे, तर व्यासपीठावर उपस्थित असलेले अजित पवारांसह अनेक इतर पक्षातून नजीकच्या काही काळात भाजप मध्ये आलेले नेते मंत्री हे सहकारातले ‘मक्तेदारी’तले आहेत की नाहीत अशी शंका शिंदे यांना आली नसावी. राधाकृष्ण विखे यांची समयसूचकता वाखान्यांजोगी असते. राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी देण्यासाठी त्यांनी आजचा योग साधला. तब्बल एक कोटींचा निधी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे यांच्या हस्ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. हा धागा पकडून मग फडणवीस यांनीही साखर कारखान्यांना टना मागे उत्तन्नातून पाच रुपयांच्या सरकरकरच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कारखान्यांना ‘काटा’ लावण्याचा इशाराच देऊन टाकला. शहा यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांची काळजी असल्याचे सांगताना राज्य सरकारचे कौतुक करताना अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने तातडीने 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करत 35 किलो धान्य दिल्याचे सांगितले. तसेच सीएम आणि दोन्ही डिसीएम यांना त्रिमूर्तीची उपमा देत हे व्यापारी नसले तरी मी इथे आल्यावर मला गाठून त्यांनी अतिवृष्टीग्रस्तांना केंद्र सरकार काय देणार यावर बोलणी केल्याचे सांगितले असले तरी आपणही त्यांच्यापेक्षा वरचढ बनिया असल्याचे अप्रत्यक्ष दर्शवत पहिल्यांदा नुकसानीचा सर्व अहवाल केंद्रा कडे पाठवा त्यानंतर पंतप्रधान यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ असे सांगत थेट कोणताही निर्णय घोषित केलेला नाही. एकंदरीत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर सर्वात शक्तिशाली मानले जाणारे आणि चाणक्य म्हणून ओळख असलेले अमित शहा महाराष्ट्रात हाहाकार उडवणार्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा उंचावल्या होत्या. झालेले नुकसान,वाताहत पाहता बळीराजाची मोठी परवड झालेली आहे. दिवाळी तोंडावर असताना दिवाळी साजरी करणे तर दूर आज खायचे काय आणि राहायचे कसे याची भ्रांत त्याला असताना तो एकेक दिवस कसाबसा काढत असताना राज्य सरकार एकीकडे पंचनाम्याचा फार्स करत आहे तर दुसरी कडे ज्यांच्या हातात देशाची सर्व सूत्र आहेत ते तो तोंडदेखले पणा करून आश्वासनावावर भागवत आपले राजकीय गणिते मजबूत करत आणि सत्कार समारंभ स्वीकारत काढता पाय घेत असतील तर बळीराजाने आता कुणाकढे पहायचे हा यक्ष प्रश्न आहे. नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राज्य सरकारला बिहारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे आहेच. नाहीतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच महानगरपालिका या हातातून जाण्याचा धोका आहे. मात्र यासाठी टायमिंग साधने हा राजकीय नेत्यांचा गुणधर्म आहे. त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामे आदी शासकीय घोळ किती दिवस चालवायचे हे सरकारच्या हातात आहे. या दरम्यान दिवाळी निघून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा मदत दिलीच तर ती नावापुरती असेल. तसेही आठ-दहा लाख कोटी कर्जात बुडालेले राज्य सरकार जास्तीची किती मदत करणार हा प्रश्न आहेच. आणि योग्य वेळ साधून केंद्र सरकार भरीव पॅकेज राज्य सरकारला घोषित करेल की जी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी बूस्टर डोस ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकंदरीत आजचा अमित शहा यांचा दौरा नेहमी प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्हा दौरा ठरला आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधींना रखडलेल्या कामामुळे प्रसिद्धीस पावलेल्या नगर-मनमाड महामार्गाने आदळआपट करत अमित शहांमुळे जाणे भाग होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्य मोठे आहे. जिल्ह्याला विखे ,थोरात यांच्या सारखे मोठे आणि दिग्गज नेते भेटले आहेत. या दोघांत एकमेकांत पटत नसले तरी त्यांनी आपापल्या परिसराचा यथोचित विकास केला आहे. नगर-मनमाड रस्ता खराब ठेवून मुख्यालय असलेल्या अहिल्यानगरीत कमीतकमी येणे त्यांचे असते. बाळासाहेब थोरातांनी तर तसे स्पष्टच बोलून दाखवले आहे. पालकमंत्री या नात्याने विखे येत असले तरी काही वेळी ते हेलिकॉप्टरचाही वापर करतात. मात्र केंद्रीय पातळीवरील शीर्ष नेत्यांचे कार्यक्रम ते लोणी,प्रवरा नगर परिसरात घेतात. “साईबाबा दर्शन आवडे सर्वांना”, त्याला विखे तरी काय करणार. दक्षिणेत केंद्रीय महत्वाचे मंत्री,नेते येत नसल्याची मात्र दक्षिणेतील अनेक त्यांच्याच पक्षांच्या नेत्यांची जाहीर गोड तक्रार अनेकदा ऐकायला मिळालेली आहे. आताही अमित शहा आले आणि सर्व प्रथम साई समाधी मंदिरात दर्शनाला गेले. आणि त्यानंतर त्यांनी विखे, कोल्हे यांचे शाही सत्कार स्वीकारत जोरदार भाषण करतानाच अतिवृष्टीमुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांना राज्याचा अहवाल आल्यानंतर दिलासा देण्याचे आश्वासन देऊन शहा दिल्ली परतीच्या प्रवासाला रवाना झाले.