अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग
:उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण आज पहाटे तीन वाजता भरले.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
सकाळी ६ वाजता धरणाच्या स्पीलवे मधून 11406 क्युसेक तर वीज निर्मिती साठी 850 क्युसेक असा 12 हजार 231 क्युसेक विसर्ग सुरू होता.अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली.
आज सकाळी भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच टप्प्याटप्याने या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे.प्रशासनाच्या वतीने प्रवरा नदीकाठच्या गावांना नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित वा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
15 ऑगस्टचा मुहूर्त हुकला!!
-भंडारदरा धरण अनेकदा 15 ऑगस्ट पूर्वी भरत असते. याबाबत वर्षा पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता असते. यानिमित्ताने 15 ऑगस्ट सुट्यांचा आनंद घेताना हजारो पर्यटक नगर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्यासंख्येने इथे येत असतात. यंदा सलग तीन दिवस सुट्टी असताना मात्र धरण पूर्ण क्षमतेने न भरले असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. मात्र आता धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने आणि 12 हजारावर क्यूसेक्स ने प्रवाह प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आल्याने धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता असून प्रवरा खोऱ्यातील शेतकरी सुखावला जाणार आहे.