अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे):
छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!
कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद..
अहिल्यानगर गुन्हे शाखा,विशेष पथकाची कामगिरी.. दोन आरोपी मुद्देमालासह नेवाशातून जेरबंद
अहिल्यानगर/नेवासा:
-अहिल्यानगर-छ.संभाजीनगर मार्गावर नेवासा फाटा येथून छत्रपती संभाजी नगर कडे जाण्यासाठी धर्मनाथ टिकाराम जोहरे (रा.गारखेडा, छ.संभाजीनगर) थांबलेले असताना त्यांना स्विफ्ट कार चालकाने छ.संभाजीनगर मधे सोडतो असे सांगून वाटेत त्यांची चाकूचा धाक दाखवून लूटमार केली होती. त्यांचे कडील लॅपटॉप, घड्याळ,मोबाईल फोन, रोख रक्कम आरोपींनी लुटली होती. याबाबत नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अहिल्यानगर ते छ.संभाजीनगर रस्त्यावर नुकत्याच दोन घटना घडल्याची नोंद होती. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने नव्याने दाखल झालेले जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी गुन्हे शाखा आणि विशेष पथकाच्या माध्यमातून गुन्ह्याची उकल सुरू केली असता आणि तांत्रिक विश्लेषण केले असता लूटमार करणारे आरोपी नेवासे तालुक्यातील म्हसले येथील असल्याची माहिती मिळाली. तसेच सदर आरोपी भेंडा येथुन नेवासा फाटा कडे येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि विशेष पथकाचे पो.उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आमदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांच्या पथकाने संबंधित आरोपींना नागापूर फाटा कमानीजवळ सापळा रचून थांबवले आणि अधिक माहिती घेतला असता त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी महेश बाबासाहेब शिरसाट (वय 26 वर्षे राहणार म्हसले, तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर) तसेच आरोपी गौरव शहादेव शिरसाट वय (वर्ष 25) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास करता त्यांनी त्यांच्याकडील मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने या दोन्हीही आरोपींना नेवासे पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. सदर गुन्ह्याची आरोपींनी कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, गुन्ह्याच्या वेळी वापरलेली कार, चाकू असा एकूण सहा लाख पाचशे रुपय किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी किरणकुमार कबाडी तसेच विशेष पथकाचे अधिकारी पो.उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि कर्मचारी यांनी केली आहे.