प्रभावती घोगरे स्पष्टच बोलल्या..प्रवरेतील सहकारातून निर्माण झालेली संस्था आता व्यक्तिगत प्रॉपर्टी झाली..
राज्यासह प्रवरा परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना केलेला अफाट खर्च पुरग्रस्तांसाठी वापरला का नाही -घोगरे
प्रवरेच्या सहकार उन्नतीची केंद्रीय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना गाडगीळ आणि मेहतांची आठवण मग इतरांना विसर का??
राजेंद्र त्रिमुखे।अहिल्यानगर: रविवारी केंद्रीय गृहमंत्री त्याचबरोबर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील तसेच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व विखे सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ पार पडला. यानंतर शेतकरी मेळावा शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे तसेच पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या बद्दल स्तुती सुमने बहाल केली. यावर आता काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांनी टीकास्त्र सोडताना केंद्र आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठबाई मेहता यांची आठवण आपल्या भाषणात प्रकर्षाने काढली मात्र इतर नेत्यांना त्यांची आठवणही आली नाही असे सांगताना प्रवरा परिसराच्या भागात उभा राहिलेला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखान्यात गाडगीळ,मेहता आणि अण्णासाहेब शिंदे यांचेही मोठे योगदान असल्याची आठवण करून दिली. यावेळी प्रभावती घोगरे म्हणाल्या की निश्चितच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे योगदान विसरता येणार नाही. मात्र सहकार हा कोणा एकट्याचा नसतो. मात्र आता फक्त एकाच कुटुंबाचे नाव का? प्रवरा परिसराच्या विकासात गाडगीळ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यावेळी अनेकांनी आपल्या जमिनी दिल्या. अनेकांनी कर्ज काढली. मात्र या सर्वांचा विसर पडलेला आहे. असे नाव न घेता घोगरे यांनी विखे परिवारावर टीका केली. पुढे बोलताना घोगरे म्हणाल्या की एकीकडे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग बेहाल झालेला आहे. शेतकऱ्यांची दाणादाण उडालेली आहे. शेतीचे केवळ पिकेच नाही तर जमीनच वाहून गेलेले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची सरकारकडून मोठी अपेक्षा असताना प्रवरा परिसरात भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला जातो. यासाठी मोठा खर्च केला गेला. वास्तविक शेतकऱ्यांना सध्या ओल्या दुष्काळाची घोषणा गरजे आहे. ती करण्यात येत नाही. शेतकऱ्यांचे कांदा पिक वाया गेले आहे. अनेक पिकं नष्ट झाली आहेत. पशुधन वाहून गेल्याने दुधाचे उत्पन्न नसल्यासारखे झाले आहे. दुसरीकडे नगर-मनमाड रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यावर कुणी काही बोलत नाही. इतकी स्थिती जिल्ह्यात आणि राज्यात वाईट असताना एवढा अफाट आणि अफाट आणि आणि अमाप खर्च लोणी प्रवरानगर येथील कार्यक्रमात करण्यात आला. दहा-दहा फुटावर फ्लेक्स लावण्यात आले. यावर पैसा खर्च करण्यापेक्षा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती. आपल्याच (विखेंच्या) मतदारसंघातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आधी पहा. ही कार्यक्रमाला झालेली गर्दी दिसत आहे ती शेतकऱ्यांची नव्हती असे घोगरे यांनी सांगत शेतकऱ्यांचे सध्या खळे चालू आहे. शेतकरी कार्यक्रमाला हजरच नव्हता. शेतकरी शेतात आहे. त्याची शेती पाण्यात गेलेली आहे. जे काही वाचले ते सोयाबीन, बाजरीचे पीक कसेबसे काढण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहे. सभेला आलेला व्यक्ती मोठ्या प्रमाणात हा प्रवरा परिसरातील विविध संस्थेचा कर्मचारी वर्ग होता असा दावा प्रभावती घोगरे यांनी केला. लोणी प्रवरा येथील प्रगतीला केवळ पद्मश्री यांचेच नव्हे तर गाडगीळ, मेहता, शिंदे यांचे मोठे योगदान आहे. मात्र केवळ आज एकाच कुटुंबातील व्यक्तींना याचे श्रेय दिले जात आहे. गाडगीळ, मेहता, शिंदे या सुशिक्षित आणि शिक्षित विचारवंतांनी शेतकऱ्यांसाठी हा साखर कारखाना स्थापन केला. सहकार हा कोणा एकट्याचा नसतो. त्यात अनेकांनी आपले जीवन झोकुन दिले आहे, असे प्रभावती घोगरे म्हणाल्या. खरा इतिहास मागे पडत चालला आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या जमिनी, पैसा जामीन राहून हा कारखाना उभा केला त्यांची नावे आता कुठेही घेतली जात नाहीत. वस्तुस्थिती खूप वेगळी झाली असून सहकारातून निर्माण झालेली संस्था आता व्यक्तिगत प्रॉपर्टी झालेली आहे. यावेळी प्रभावती घोगरे यांना गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा संदर्भ देत विखे आणि विवेक कोल्हे यांच्यातील संघर्षाबाबत विचारत कोपरगाव येथील कार्यक्रमात विखे आणि विवेक कोल्हे एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले असल्याबद्दल विचारले असता घोगरे म्हणाल्या की राजकारणात गणिते सारखे बदलत आहेत. पण आपण आपले तत्व न बदलता एकाच तत्त्वावर काम करत आहोत. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आपला लढा चालू आहे आणि भविष्यातही हा लढा असाच सुरू राहील असा विश्वास प्रभावती घोगरे यांनी न्यूजनगरी न्यूजशी बोलताना व्यक्त केला.