किरण काळे प्रकरणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन..
किरण काळे यांच्यावर दाखल खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच महापालिकेतील रस्ते घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
अहिल्यानगर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी अलीकडेच अहिल्यानगर महानगरपालिकेतील ७७६ रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या अंदाजे ४०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप जनतेसमोर मांडले. त्यांनी सरकारी निधीच्या अपहाराबाबत ठोस पुरावे सादर करून शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नासंदर्भामध्ये सरकारला सुद्धा पत्र पाठवून या मुद्द्द्याकडे लक्ष वेधले होते. याच पार्श्वभूमीवर नगर कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात आली, ही बाब अत्यंत धक्कादायक, अन्यायकारक आणि पूर्वनियोजित असल्याचे आम्हाला जाणवते. ही कारवाई एक प्रामाणिक, निर्भीड लोकप्रतिनिधी दडपशाहीखाली आणण्याचा कटकारस्थानाचा भाग आहे असल्याचे ठाकरे शिवसेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी स्पष्ट केले आहे. आज मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावे शहर पोलीस उपअधीक्षक भारती यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठनेते गिरीश जाधव आदी उपस्थित होते.
राठोड पुढे म्हणाले की, खोटे आरोप लावून किरण काळे यांची बदनामी करण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय आहे. एका बोगस तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनाचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट दिसते. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लोकायुक्त व मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अगोदर किरण काळे यांच्यावर एमआयडीसी येथील आयटी पार्क चा सुद्धा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचा गुन्हा या अगोदर दाखल झालेला होता. तसेच नगर शहरांमध्ये सुद्धा या अगोदर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर असे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळ्या जनतेला माहित आहे. किरण काळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हयाची सखोल, निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्यात यावी असे सांगत राठोड यांनी पोलीस प्रशासनाला पुढील मागण्या केल्या आहेत. खोटे आरोप करून चुकीची माहिती देणाऱ्या आणि पोलिस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. किरण काळे यांनी उघडकीस आणलेल्या ४०० कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्याची स्वतंत्र व विशेष चौकशी करण्यात यावी. किरण काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या कार्यात निःस्वार्थपणे योगदान देत आहेत. त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने खोटे आरोप लावणे हा लोकशाही प्रक्रियेवरच घाला आहे. त्यामुळे या प्रकरणात त्वरित लक्ष घालून योग्य ती चौकशी व न्याय दिला जावा, अशी आमची मागणी केली आहे.
