अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे):
यंदाची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थाने चर्चेत आली ती 23 तारखेला मतमोजणी नंतर आलेल्या निकालाने!! राज्यातील महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा झालेला पराभव चर्चेत त्यामुळेच आला आणि मविआ आघाडीला 288 जागांमध्ये अर्धशतकही गाठता न आल्याने विरोधी पक्षांकडून ईव्हीएम विरोधात आता मोहीम सुरू झाली आहे.
विरोधी पक्षांतून एकीकडे ईव्हीएम विरोधात विविध पातळ्यांवर मोहीम सुरू असतानाच कसेबसे जिंकलेले मविआ आमदार आता विजय साजरा करत आहे तर उरलेले दिग्गज चिंतन सभा घेत पराभवाची कारणे शोधत कारणमीमांसा करत आहेत. याच अनुषंगाने आज मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे मविआचे आमदार रोहित पवार विजयी रॅली काढत असतानाच मविआ चे संगमनेर मधे पराभूत झालेले काँग्रेसचे जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन करत पराभवा नंतर पहिल्यांदाच जाहीर व्यक्त होणार आहेत.
रोहित पवारांचा विजय आणि बाळासाहेब थोरात यांचा पराभव एक चिंतनाचा विषय निश्चितच आहे. कारण या ठिकाणी पराभूत झालेले राम शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम वर शंका घेत ईव्हीएम फेर मतमोजणी साठी शुल्क भरून तसा अर्ज केला आहे. तर विजयी झालेले रोहित पवार यांनी यानिमित्ताने राम शिंदेंवर निशाणा साधत राम शिंदेंची मागणी ईव्हीएम मधे संशय असलेल्या आमच्या आरोपांना पृष्ठी देणारी आणि यानिमित्ताने मोदी-शहांना त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने आव्हान देणारी असल्याचा टोला लगावला आहे. तर इकडे संगमनेरात आश्चर्यकारक विजयी झालेले अमोल खताळ यांनी थोरातांनी केलेल्या ईव्हीएम री कौंटींग मध्ये माझे मताधिक्य अजून वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
रोहित पवार हे काठावर निवडून आले आहेत. यावर काका अजित पवारांनी, बेट्या थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झाले असते?? असे रोहित पवारांना म्हणत राम शिंदेंच्या पवार कुटुंबा बाबत मॅच फिक्सिंग आरोपाला पुष्टी देण्याचा प्रकार केला आहे. राम शिंदे विधांपरिषदेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघात आणि विधानमंडळ सभागृहात या दोघात तुतु-मैमै दिसणार असून त्याची सुरूवात आजच्या रोहित पवारांच्या विजयी रॅलीच्या निमित्ताने होणार असे दिसत आहे.
संगमनेर मधून थोरातांचा झालेला पराभव त्यांच्या साठी तसेच पक्षासाठी धक्कादायक असाच आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी त्यावर हळहळ व्यक्त केली असून अजित पवारांनी तर थोरात विधानसभेत हवे होते, त्यांच्या अनुभवाचा फायदा सभागृहात आणि राज्याला होतो अशी प्रतिक्रिया देत सत्ताधारी पक्षाला बुचकळ्यात पाडले आहे. राज्यातील अनेक नेते थोरातांना संगमनेर मध्ये येऊन भेटत आहेत. थोरात कॉन्ग्रेस केंद्रीय कमिटीतीवर सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे वलय मोठे आहे. तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व राजकारणात सर्वपक्षीय आदरयुक्त आहे. ईव्हीएम बाबत थोरातांनी संशय व्यक्त केला असला तरी त्यात आक्रमक भूमिका दिसत नाही. मात्र आज स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने थोरात काय व्यक्त होतात याकडे निश्चितच राज्याचे लक्ष असणार आहे.