नगर:
लोकसभा निवडणुका आता येणाऱ्या आठवड्यात घोषित होणार अशी परिस्थिती असताना नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी यासह महाराष्ट्रातील उमेदवारीचा घोळ महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुटता सुटेना असे दिसत आहे. मविआच्या मुंबईत तर महायुतीच्या दिल्लीतील बैठकांचा रतीब सुरू असताना यात ज्या जागांवर कसलाही आक्षेप नाही अशा जागांवरील उमेदवारीही जागा वाटपाच्या तिढ्यात अडकून पडली आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा की गैरफायदा आता संभाव्य उमेदवारांचे पक्षांतर्गत विरोधक आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवी साठी करत एकप्रकारे विद्यमान आणि पर्याय नसलेल्या तसेच निवडून येण्याची पूर्ण ताकत असलेल्या उमेदवारासाठी करण्याची संधी साधत असून यात जरी कुणाला असुरी आनंद मिळत असला तरी शेवटी झालेच तर पक्षाचे नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रकर्षाने भाजप मध्ये असल्याची मोठी चर्चा सुरू झाली असून एकंदरीत गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून याला पुष्टी मिळत आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असणे आणि त्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागणे हे लोकशाहीला धरून रास्त गोष्ट आहे. पण पक्ष प्रणालीचे संकेत मोडत आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहोत,पक्षाने उमेदवारी दिल्यास लढवणार असे वारंवार माध्यमातून सांगने म्हणजे तुमच्या इच्छेची पक्ष शीर्ष नेतृत्व दखल घेत नसल्याने नेतृत्वाचे लक्ष खेचण्याचा प्रकार आहे का? पक्षाची शिस्त यात मोडत नाही का? तुमचा तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? की तुम्ही हे जाणीवपूर्वक कुणाच्या सांगण्यावरून करत आहात असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याचे आता प्रचंड विस्तारलेल्या भाजपातील कार्यकर्ते खाजगीत चर्चा करताना बोलत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्वात आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या देखरेखीखाली पक्षांतर्गत शिस्तीला मोठे महत्व आहेत. पक्षाचे प्रोटोकॉल अनेक जेष्ठ,वरिष्ठ नेते पाळताना दिसतात. 2024 महाविजया साठी मोदी-शाहा सरसावले असून महाराष्ट्रात मिशन 45प्लस चे उद्दिष्ट आहे. यात कुणालाही कसली कसूर करता येणार नाही. अशा परीस्थित नगर दक्षिण-उत्तरेतील काही नेते मंडळी लोकसभेच्या संभाव्य विरोधात असू शकणाऱ्या उमेदवाराच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात,जोरदार भाषणे करतात, मनोकामना पूर्ण होओ असा टाळ्या वसूल करणारा आशीर्वाद देतात. काही जण सीमोल्लंघन करत दक्षिणेत येत उत्तरायण करत ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात, यात आपण नुकसान एका व्यक्तीचे करत आहोत की जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी बिरुदावली लागलेल्या आणि अबकी बार 400 पारचा विश्वास व्यक्त करणाऱ्या पक्षाचे करत आहोत याचे भान दिसून येताना दिसत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
सध्या नगर दक्षिणेत विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना आपले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील विरोधक कोण असा प्रश्न पडला असेल तर नवल नसावे. सुरू असलेल्या चर्चे नुसार विखे परिवाराने आपली उमेदवारी निश्चित मानत गेल्या वर्षभरापासून 2024 निवडणुकीसाठी काम सुरू केले आहे. यात सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा, केंद्रातून आणलेल्या करोडोंच्या निधीचा, विविध योजनांचा, वाढीव निधीतून केलेल्या कामांचा, रस्ते,पाणी,वीज यासह शेतकरी, कामगार, उद्योजक,रोजगार आदीं साठी भरीव काम केलेले असल्याने आपल्या कामांच्या शिदोरीवर जनसंपर्क कायम ठेवला. नगर शहरातील 20 वर्षे प्रलंबित उड्डाणपूल पूर्ण करत, अनेक वर्षे खड्यात असलेला रिंगरोड नव्याने बांधून तसेच अनेक महामार्गांचे काम पूर्णत्वास नेऊन दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवला. वयोश्री योजनेतून लाखो वृद्धांना गरजेचे आरोग्य साहित्य मोफत वितरित केले. आयुष्यमान योजनेत हजारो लाभार्थींना समावेश होईल यासाठी गाव ते शहर पातळीवर अभियान राबवले. अशी कामांची मोठी जंत्री असताना सध्या सुजय विखे यांची उमेदवारी धोक्यात अशा वावड्या उठवल्याजात असल्याचा छुपा कार्यक्रम सुरू असल्याचे युवा कार्यकर्ते म्हणत आहेत.
या परस्थितीत भाजपा कडून महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा महायुती जागा वाटपात काहीशी रेंगाळली असली तरी त्याचा आणि नगर दक्षिणेतील उमेदवारीचा संबंध नसल्याचे स्पष्ट आहे. निश्चितच पक्षाचे काही सर्वे आले असले तरी ते नेमके काय? याबद्दल कुणालाही खात्रीशीर माहिती नसणार आहे. भारतीय जनता पक्ष खूप मायक्रो लेव्हल वर जात काम करत निर्णय घेत असतो. त्यामुळे कुठेतरी एखाद्या गटाचेकाही म्हणणे असले तरी गेल्या पाच वर्षात केलेली कामे,पूर्णत्वास नेलेल्या योजना, जनसंपर्क आणि लोकप्रियता, उच्च शिक्षण, विषयांचा गाढा अभ्यास आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठता या गोष्टींचा अहवालही निश्चितपणे पक्षाकडे असू शकणार आहे. त्यामुळे विद्यमान खा.डॉ.सुजय विखे यांची उमेदवारी अंतिम झाल्याचे सूत्रांकडून समजत असल्याची चर्चा असून उमेदवारी विषयावर विखे निश्चिंत असताना काही विरोधकांवरच उमेदवारी न मिळण्यासाठी देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर कोण काय करतो वा काय बोलतो याकडे लक्ष न देता खा.विखे मतदारसंघात आयोजित विविध कार्यक्रम पार पाडण्यात व्यस्त असल्याचे समजते.