पारनेर(प्रतिनिधी):
पारनेर तालुक्यातील मेंढपाळ बांधवांची मोठी संख्या पाहता ढवळपुरी परिसरात लोकर संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली असताना हे केंद्र तालुक्यातील करंदी येथे सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिध्द झाल्याने मेेंढपाळ बांधवांमध्ये उद्रेक निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर धनगर बांधवांनी टीका दिसून येत आहे.
लोकर संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर दि. १० जुलै २०२३ रोजी पारनेर तालुक्यात लोकर संशोधन केेंद्र सुरू करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली होती. तत्वतः मान्यतेनंतर पुण्यश्लोक पुणे येथीलअहिल्यादेवी महाराष्ट्र मेंंढी व शेळी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयातून लोकर संशोधन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून घेणे तसेच जागा प्राप्त झाल्यानंतर केंद्रासाठी आवश्यक असेलल्या इमारतीचा आराखडा, मशीनरी, मनुष्यबख तसेच फर्निचर इत्यादी बाबींसाठी येणाऱ्या खर्चाचा सविस्तर तपशिलासह प्रकल्प अहवाल शासन मान्यतेसाठी सादर करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
महसूल व वन विभागाच्या दि. ९ फेब्रुवारी २०२४ च्या आदेशान्वये तालुक्यातील करंदी येथील गट नंबर १२२२ मधील एकूण क्षेत्र १६.७३ हे. आर पैकी ३.०० हेक्टर जमीन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त यांना मुल्यरहित व महसुल मुक्त किमतीने भोगवटादार वर्ग २ म्हणून प्रदान करण्यात आली आहे.
देशाच्या अवर्षणप्रवण, अर्ध अवर्षणप्रवण आणि डोंगराळ भागात जिथे पीक आणि दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाही अशा ठिकाणी त्याचप्रमाणे अत्यल्प भुधारणा, अल्पभुधारक शेतकरी आणि भुमिहिन मजुरांना उपजिविका करण्यासाठी मेंढयांची मोठया प्रमाणात मदत होते. मेंढयांची लोकर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. मेंढयांची लोकर हे महत्वाचे नैसर्गिक फायबर आहे. लोकरमध्ये थर्मल रेग्युलेशन फलेम रेझिस्टन्स, चांगले ध्वनीशास्त्र इ. असे अव्दितीय गुणधर्म आहेत. लोकरचा वापर कपडयांपासूनप बांधकाम उद्योगापर्यंत आणि तांत्रीक कापडाच्या अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो.
महाराष्ट्र राज्यात मेंढयांची सुमारे ३० लाख इतकी संख्या असून मेंढयांपासून दरवर्षी अंदाजे ९ हजार ८०० मेट्रीक टन लोकरीचे उत्पादन होते. तथापि, राज्या खरखरीत लोकरीवर प्रक्रिया करण्यासाठी पायाभुत सुविधा नसल्यामुळे मेंढीपालन करणाऱ्या समुदायाला आर्थिक फायदा होऊ शकत नाही. डेक्कनी मेंढयांच्या काळया आणि तपकिरी लोकरपासून विविध मुल्यवर्धित उत्पादने विकसित केली जाऊ शकतात. तसेच या लोकरापासून योगा चटई आणि रजई यांसारखी मुल्यवर्धित वुल फेल्ड उत्पादने मिळू शकतात. अशा उत्पादनांची निर्मिती महाराष्ट्रातच मोठया प्रमाणावर होऊ शकते. मुल्यवर्धनाच्या दिशेन लोकर प्रक्रिया उद्योगाची स्थापना केल्याने मेंढीपालन समुदायाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि ग्रामिण भागातील शहरांकडे हाणारे स्थलांतरही कमी होईल.
पारनेर तालुक्यात सर्वाधिक मेंढया:
-नगर जिल्हयात सर्वात जास्त म्हणजे सुमारे ३ लाख इतक्या मेंढयांची संख्या आहे. त्यातील सर्वाधिक संख्या पारनेर तालुक्यात आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यात हे केंद्र सुरू करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
जिथे हब तिथेच केंद्र हवे:
-जिथे मेंढयांचा हब आहे तिथेच लोकर संशोधन होणे गरजेचे आहे. यासंदर्भात आपण विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून हे केंद्र ढवळपुरी, धोत्रे परिसरात व्हावे यासाठी पुढाकार घेणार आहे.
-डी.आर.शेंडगे
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष
▪️चौकट
तर समाज आक्रमक होईल..!!
-ढवळपुरी येथे हा प्रकल्प सुरू करण्याचे अश्वासन देण्यात आले होते. यासाठी राज्य शासनाच्या जमीनींची कागदपत्रेही सादर करण्यात आली. काही ठिकाणी के.के. रेंजचे कारण देण्यात आले तर काही ठिकाणी घरांच्या अतिक्रमणाचे कारण देण्यात आले. एका ठिकाणी राज्य शासनाच्या जागेवर न्याय प्रविष्ट आहे असे कारण दाखविण्यात आले. या तिनही जागा सोडून इतरही जागा होत्या. धनगर समाजाचे वास्तव्य ढोकी, वनकुटे, ढवळपुरी या भागात मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथेच होणे गरजेचे आहे. भटक्या मेंढपाळांना करंदी गावच माहीती नाही. ढवळपुरीपासून करंदीचे अंतरही फार आहे. ढवळपुरी परीसरात हा प्रकल्प न झाल्यास समाज आक्रमक होईल.
-नंदाताई भागाजी गावडे
सरपंच, ढवळपुरी
नामदार, खासदारांचा संबंध नाही:
-धोत्रे, ढवळपुरी, वनकुटे येथील जागा सुचविण्यात आल्या होत्या. तांत्रीक अडचणींमुळे या जागा शासनाने नाकारल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वनकुटे तालुक्याच्या एका टोकाला असल्याने तसेच धनगर बांधवांसाठी गैरसोईचे असल्याने ही जागा नाकारण्यात आली. अधिकाऱ्यांनी करंदी येथील सात बारा जोडून प्रस्ताव पाठविला. करंदी येथील जागा आम्हालाही मान्य नाही. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा करून या प्रश्नातून मार्ग काढण्यात येईल. करंदी येथे हे केंद्र सुरू करण्यात खा. विखे अथवा ना. विखे यांचा काही संबंध नाही. ज्या भागात धनगर बांधव वास्तव्यास आहेत तिथेच हा प्रकल्प व्हावा.
-विश्वनाथ कोरडे
राज्य कार्यकारणी सदस्य, भाजपा