गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाळकीत केला मुक्काम!
नगर:
गाव चलो अभियानांतर्गत नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कालचा रविवार नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम करून गावातील नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेत व्यतीत केला.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने ‘गाव चलो अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांनी रविवारी वाळकी गावात दिवसभरात गावातील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी एका शिक्षकाच्या भूमिकेतून चर्चा केली आणि योग्य ते मार्गदर्शन केले. त्याचबरोबर धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच महिला बचत गट, शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच त्यांच्या या भेट दौऱ्याच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जास्तीत जास्त योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना केले. या विविध लोकोपयोगी योजनांपासून जे अद्यापही वंचित असतील अशा सर्व लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा या अनुषंगाने मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना दिली.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व योग्य मार्गदर्शन खा. विखे पाटील यांनी यावेळी केले. तसेच विविध लोकोपयोगी योजनांपासून जे अद्यापही वंचित असतील अशा सर्व लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेच्या पुस्तिका लोकांना वाटप केल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या कामांबाबत माहिती दिली आणि नागरिकांच्या अडी अडचणी देखील जाणून घेतल्या.
दरम्यान या दिवसभराच्या कार्यक्रमात त्यांनी धर्मनाथ शैक्षणिक संस्थेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्नोत्तराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षाच्या कालखंडात व कोविडच्या काळात जे काही प्रशंसनीय काम करून या संकटकाळात मदत केली ती अविस्मरणीय आहे. इतर देशांवर अवलंबून न राहता स्वतःच्या देशात लस तयार करण्याचा एक चांगला निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्याचा सर्व नागरिकांना फायदा झाला अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच राजकारणावरती विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता यावर उत्तर देताना खासदार विखे पाटील यांनी सांगितले की, शिक्षणाचा फायदा मला एक सुशिक्षित राजकारणी बनण्यासाठी झाला. जो व्यक्ती योग्य शिक्षण घेतो आणि तो व्यक्ती जर राजकारणात सक्रिय असला तर तो चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करतो असे स्पष्ट करून विकासाच्या निकषावर लोकप्रतिनिधींना निवडले पाहिजे. आपल्यासारखे विद्यार्थी व सुशिक्षित लोक या समाजामध्ये बदल घडवू शकतात व घडवतात. कारण आपल्या भागाचा आर्थिकदृष्ट्या विकास करण्यास लोकप्रतिनिधी सक्षम असला पाहिजे तरच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होत असतो. अशा पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यासोबतच महिला बचत गटांना सुजय विखे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप केले. महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कसे बनविता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान खा.विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सदरील अभियान हे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे प्रमुख प्रतिनिधी, कार्यकर्ते, जिल्हा अधिकारी, तालुका पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी, सर्व सुपरवायझर्स, बूथ प्रमुख यांच्या सहकार्याने व्यवस्थितरीत्या संपन्न झाले असल्याचे मत मांडले.







