डॉ.प्रल्हाद पाटील यांच्या विरोधात शेवगाव पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल..
शेवगाव:
शेवगाव मधील साई पुष्प हॉस्पिटलचे डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी नगर येथील डॉक्टर सतीश सुधाकर त्रंबके यांची परवानगी नसताना आणि त्यांना अज्ञात ठेवत त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शेवगाव येथील डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी तब्बल 232 रुग्णांवर उपचार करत शासनाकडून 54 लाख 50 हजार 500 रुपये काढले आहेत. याबाबत डॉक्टर सतीश सुधाकर त्रंबके (राहणार अहमदनगर) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्यातक्रारी वरून साईपुष्प हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रल्हाद गवाजीनाथ पाटील यांचे विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर सतीश त्रंबके यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 2002 ला आपण एमबीबीएस व एमडी मेडिसिन ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. त्याप्रमाणे नियमानुसार विखे पाटील मेडिकल कॉलेज तसेच सुपा येथील ओंकार हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलची करार करत या ठिकाणी फिजिशियन म्हणून काम पाहत आहे. दि. 25 एप्रिल 2023 रोजी ओळखीचे असलेले महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी डॉक्टर निलेश गोसावी यांच्याकडून मला समजले की साई पुष्प हॉस्पिटल निळकंठ नगर, शेवगाव या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रल्हाद गवाजिनाथ पाटील यांनी माझ्या नावाने महात्मा फुले जन आरोग्य योजना या शासकीय योजनेअंतर्गत रुग्णांवर उपचार करून शासनाकडून मोठी रक्कम मिळवली आहे.
याबाबत डॉक्टर सतीश त्रंबके यांनी, आपण डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना अथवा इतर कुठल्याही कामानिमित्ताने कधीही भेटलो नाही. त्यांच्याशी माझा कोणत्याही माध्यमातून द्वारे अद्याप कधीही संपर्क झालेला नाही. त्याचबरोबर मी शेवगाव येथील त्यांच्या साई पुष्प हॉस्पिटलला कधीही गेलो नाही किंवा तेथील रुग्णांची तपासणीही केलेली नाही. त्यामुळे मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना नोटीस पाठवून तुम्ही मला कोणतीही पूर्वकल्पना न देता व माझी संमती न घेता माझ्या कागदपत्रांचा लबाडीने गैरवापर करून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घेत आहात., अशी विचारणा केली. मात्र डॉक्टर प्रल्हाद पाटील यांच्याकडून माझ्या नोटीसीला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी नोटीसीचे उत्तरही दिलेले नाही. त्यामुळे डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी माझ्या वैद्यकीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याबाबत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तसेच वैद्यकीय तसेच सिविल सर्जन अहमदनगर यांच्याकडे लिखित तक्रार केली होती. परंतु त्यांच्याकडूनही माझ्या तक्रारी वरून कोणतेही कारवाई करण्यात आलेले नाही असं तक्रारीत डॉक्टर सतीश
त्रंबके यांनी म्हटल आहे.
माहिती अधिकारातुन उघड झाली फसवणूक!!
-दि.5 जून 2023 रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर यांना अर्ज दिला. या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर प्रल्हाद पाटील, साई पुष्प हॉस्पिटल यांनी डॉक्टर सतीश त्रंबके यांच्या नावाचा वापर करत सन 2020 ते सन 2023 या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तब्बल 232 रुग्णांवर उपचार केले आहेत त्या मोबदल्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकडून त्यांनी 54 लाख 50 हजार 500 रुपये इतकी रक्कम शासनाकडून प्राप्त करून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.