नाशिक:
नगर जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना त्यात गेल्या काही दिवसांत 3 बालकांचे बळी गेले आहेत. या परस्थितीत नगर जिल्ह्याला आणि अकोले तालुक्याला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३१ वर्षीय युवतीचा ठार झाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (दि.३०) घडली.
यात दुर्दैवी मीनाक्षी शिवराम झुगरे (वय ३१) तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव दहशतीच्या छायेत आहे.
या घटनेची माहिती मिळताच नाशिक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास मीनाक्षी घराबाहेर पडताच बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली. यात गंभीर जखमी झालेल्या मिनाक्षीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भागात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दुर्दैवी पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मथुरा भगत यांनी केली आहे.
दरम्यान, वनविभागाने याप्रकरणाची गंभीर दखल घेत, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.