कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी घेतली उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची भेट
मुंबई:
कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांना सदर घटनेच्या केसच्या सद्यस्थितीबाबत व केस मधील प्रलंबित विषयाबाबत माहिती दिली. तसेच कुळधरण ग्रामपंचायत पोलीस पाटील श्री. समीर पाटील यांनी गावातील विविध विकासकामांबाबतचे निवेदन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना दिले.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सदर केसच्या मध्ये शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे त्यांना सांगितले. तसेच याप्रकरणाची सद्यस्थिती मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे कडे उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुळधरण ग्रामपंचायत विकासासाठी सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
——
कोपर्डी बलात्कार प्रकरण
13 जुलै 2016च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
महाराष्ट्राचे समाजमन ढवळून काढणार्या कोपर्डीतील त्या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे (25), सहआरोपी संतोष गोरख भवाळ (30) व नितीन गोपीनाथ भैलुमे (25) यांना कोर्टाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी विविध कलमांनुसार तपशीलवार निकालाचे वाचन करून अवघ्या पाच मिनिटांत निकाल दिला. बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा होण्याचा हा सर्वात वेगवान निकाल असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पूबाबूलाल शिंदे याने येरवडा कारागृहात फाशी घेत आत्महत्या केली आहे. उर्वरित आरोपींवर तातडीने फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पीडित कुटुंब आणि मराठा समाजातून वारंवार करण्यात आलेली आहे.
कोपर्डी निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सकल समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्च्याचा उदय झाला आणि पुढे मराठा क्रांती मोर्च्यात मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीने जोर पकडला.