नगर:
चालू वर्षांमध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी असो वा महायुती असो या दोन्हीही आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी अनेक लोकसभा आणि विधानसभा जागांवर आता दावा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यास चे स्पष्टपणे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. आमच्याकडे लोकसभे साठी 3 प्रबळ उमेदवार असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. त्याच बरोबर लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नगर आणि पारनेर यासह अजून काही जागांवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना दावा करणार असल्याचं संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नगर शहरात येत्या 28 जानेवारी रोजी दक्षिण नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. या अनुषंगाने आज बुधवारी नगरमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी दक्षिण नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद मोठी असून त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या तसेच 28 जानेवारी रोजी होणारा मेळावा भव्य दिव्य केला जावा या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संपर्कप्रमुख शिंदे यांनी नगर दक्षिणे मधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी हा मेळावा होत आहे असे सांगितले. यावेळी त्यांना नगर आणि पारनेर मध्ये अनेक वर्ष शिवसेनेचे आमदार होते मात्र 2019 मध्ये एकही आमदार नगर जिल्ह्यामध्ये निवडून आलेला नाही, त्याचबरोबर नगर आणि पारनेर येथील आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार आता महायुती मध्ये अजित पवार गटात आहेत. या परिस्थितीत शिवसेनेची भूमिका विचारली असता त्यांनी, आम्ही सध्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून खासदार राऊत यांच्या उपस्थितीत त्यासाठी मेळावा होत आहे. आम्ही शिर्डी लोकसभा मतदार संघासह नगर दक्षिण मतदार संघावरही आमचा दावा असून त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नगर आणि पारनेर मध्ये त्याचबरोबर अजून जागेवर शिवसेना उमेदवारीचा दावा करणार असल्याचं स्पष्टपणे आमदार शिंदे यांनी सांगितले.
दक्षिणेवर दावा पण उमेदवार कोण??
– यावेळी संपर्कप्रमुख आमदार शिंदे यांनी दक्षिण नगर दक्षिण लोकसभेवर दावा दाखल करताना आमच्याकडे तीन प्रबळ उमेदवार यासाठी असल्याचाही सांगितले. मात्र हे तीन उमेदवार कोण याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली नाही. 28 जानेवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यात इतर पक्षातुन शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. त्यामुळे शिवसेना मेळाव्यामध्ये लोकसभेसाठी असलेला प्रबळ उमेदवार पक्षप्रवेश करणार का याची उत्सुकता आता लागली आहे. मात्र नगर दक्षिणेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असून त्यांचाही उमेदवार आत्तापर्यंत अंतिम झालेला नाही. अशात नगर दक्षिणेतील जागेवर शिवसेनेने दावा केल्याने आता मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे.
कोरोना काळात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नगर भेटीनंतर कोणत्याही वरिष्ठ नेत्याने नगर दक्षिणेत लक्ष दिलेले नाही, याबाबत पत्रकारांनी संपर्कप्रमुख शिंदे यांना छेडले असता त्यांनी नगदक्षिणेमध्ये शिवसेनेची मोठी ताकद असल्याचे सांगतानाच नगर, पारनेर आदी शहरांमध्ये शिवसेनेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आता खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नगर दक्षिणेचा मेळावा नगर शहरात होत असून येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकात शिवसेना पक्ष ताकदीनिशी उतरणार असल्याचं सांगितले. जिल्ह्यामधून दोन्हीही खासदार शिवसेनेचे निवडून येऊ शकतात असा विश्वास आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.