#संपर्क प्रमुख याची हकालपट्टी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी
#नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचे कोणतेही अधिकृत पत्र नसल्याचा पक्षाचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांचा खुलासा
अहमदनगर (प्रतिनिधी)-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. बर्वे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारणीची मुदत संपलेली नाही. नवीन जिल्हाध्यक्ष पदाची झालेली निवड ही पक्षाच्या घटनेला व नियमाला डावलून करण्यात आली असून, कार्यरत जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला नसताना, त्यांची मुदत संपलेली नसताना अचानक गुपचुपपणे नवीन जिल्हाध्यक्षांची झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरुन वाद निर्माण झालेला असताना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी (दि.24 जानेवारी) जिल्हाध्यक्ष साळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आदेश व कार्यकर्त्यांच्या भावनेचा अनादर करुन हुकूमशाही पध्दतीने पक्षाच्या धोरणाला पायदळी तुडवून नवीन जिल्हाध्यक्ष निवड करणारे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव याची हकालपट्टी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपस्थित रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, रिपाईचे नेते संजय कांबळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल कांबळे, जिल्हा सचिव गौरव घोडके, गौरव साळवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके, शहर सरचिटणीस योगेश त्रिभुवन, विशाल घोडके, सतीश साळवे, कृपाल भिंगारदिवे, अमोल सोनवणे, राहुल ठोंबे, शुभम ठोंबे, बापू जावळे, वॉल्वीन बनसोडे, शिवाजी साळवे, प्रमोद घोडके, अकिल शेख, सतीश लोखंडे, रवी दामोदरे, बाळासाहेब नेटके, गणेश कदम, बाळासाहेब घोडके, सागर मोरे, रिटा यादव, सारिका गांगर्डे, कविता नेटके, सुनिता घोडके, मायाताई जाधव आदींसह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी राहिलेले श्रीकांत भालेराव यांनी पक्षाचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांच्याकडे सादर केलेली जिल्हाध्यक्षांच्या कार्यकारणीची मुदत संपलेली नाही. राहुरी फॅक्टरी येथे रिपाईच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अंतिम टप्प्यात अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी निघून गेल्यानंतर जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमे यांची निवड करण्यात आली. ती निवड बेकायदेशीर व पक्षाच्या घटनेप्रमाणे नाही. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आठ दिवस सर्क्युलर काढावे लागते. क्रियाशील सभासदांमधून इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरतात आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडून अथवा सर्वांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष निवडला जातो. या निवडीसाठी पक्षाचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय अध्यक्ष यांचे आदेश घेऊन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडते. हे पक्षाचे धोरण व नियम आहे. या धोरणाला डावलून नवीन जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आल्याचे साळवे यांनी सांगितले.
नवीन जिल्हाध्यक्ष निवडीला विरोध करुन अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांना फोनद्वारे कल्पना दिली होती. ना. आठवले यांनी श्रीकांत भालेराव यांना सांगून देखील त्यांनी तो आदेश डावलून नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली. पक्षाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जी कार्यकारणी आहे तीच अधिकृत असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले आहे.
–
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांच्याकडे संपर्कप्रमुखांच्या हकालपट्टीची मागणी
संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव पक्षात गटा-तटाचे राजकारण करून पक्षाचे नुकसान करत आहे. कार्यकर्त्यांना त्रास देऊन हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याची तक्रार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मुंबई मध्ये भेट घेऊन करण्यात आली आहे. अशा संपर्क प्रमुखाच्या हकालपट्टीची मागणी आठवले यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष साळवे यांनी दिली. तर संपर्क प्रमुख वीस ते तीस वर्षापासून पदावर असून, त्यांचे वय झाले असल्याने नवीन संपर्कप्रमुख नेमण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
–—
नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचे कोणतेही अधिकृत पत्र नसल्याचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. बर्वे यांची माहिती
पत्रकार परिषद दरम्यान जिल्हाध्यक्ष साळवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांच्याशी संपर्क केला असता, बर्वे यांनी पत्रकारांशी फोनवर संवाद साधला. बर्वे म्हणाले की, सुनील साळवे यांची जिल्हाध्यक्षपदी घटनेप्रमाणे निवड झालेली आहे. ही निवड पाच वर्षासाठी आहे. अचानकपणे जिल्हाध्यक्ष पदावरुन पक्षाच्या घटनेप्रमाणे कोणालाही हटवता येत नाही. तो अधिकार फक्त राष्ट्रीय अध्यक्षांना आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या काही कायदेशीर प्रक्रिया असून, ती कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आलेली दिसून येत नाही व त्याबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र प्राप्त झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
–—
शिर्डी लोकसभा मतदार संघातून ना. रामदास आठवले निवडणूक लढविणार असून, यासंदर्भात 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा दौरा होणार असून, सभेचे नियोजन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाची ताकद आचारसंहितेपूर्वी दाखविण्याचा निर्धार रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.