नगर:
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा येत्या 28 जानेवारी रोजी नगर शहरात पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते, मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार असून मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याच्या नियोजना साठी आज नगर शहरात बैठक घेण्यात आली.
नजीक आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण नगर जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा 28 जानेवारी रोजी नगर शहरात पार पडणार आहे. या मेळाव्याचे ठिकाण, त्याचबरोबर मेळावा भव्य दिव्य होण्यासाठी करावे लागणारे नियोजन आदी गोष्टींसाठी आज नगरमध्ये दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
येणारी लोकसभा निवडणूक आत्मविश्वासाने काम करत लढवावी लागणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांची ऊर्जा पक्षाला आणि कार्यकर्त्यांना मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता झटून कामाला लागून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काम करावे लागेल असं आमदार सुनील शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आमदार शिंदे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना येणारी लोकसभा निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची असून या निमित्ताने पक्ष संघटन मजबूत करणे, पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगतानाच मेळावा भव्य दिव्य व्हावा यासाठी दक्षिण नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, स्मिता अष्टेकर यांच्यासह दक्षिण नगर जिल्ह्यातून आलेले सर्व तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.