नगर(प्रतिनिधी):
फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर, रॅलीच्या अग्रभागी घोडयांवर आरूढ झालेेले छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व मावळयांची वेषभूषा केलेेले मुले, छत्रपती शिवरायांच्या गगनभेदी घोषणा देत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर दक्षिण मतदारसंघात काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा मोठया उत्साहात समारोप करण्यात आला.
जिल्हा परिषद तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या मा. सदस्या, मा. उपसभापती राणीताई नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नगर दक्षिण मतदारसंघातील पाथर्डी, शेवगांव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे, राहुरी, नगर या तालुक्यांमध्ये शिवसंवाद यात्रेचे अयोजन करण्यात आले होते. मंगळवारी नगर शहरात या यात्रेचा शहरातून रॅली काढून समारोप करण्यात आला. बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सांगता करण्यात आली.
यावेळी बोलताना राणीताई लंके म्हणाल्या, 2 जानेवारी रोजी मोहटादेवी, पाथर्डी येथून शिवस्वराज्य यात्रेस प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयास साडेतीनशे वर्षे पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मनामनात, घराघरात शिवरायांचे विचार कसे पोहचतील, कसे रूचतील यासाठी नगर दक्षिणमधील खेड्या, पाडयांमध्ये, गावागावांमध्ये ही यात्रा पोहचली. कर्जत, जामखेड, शेवगांव, श्रीगोंदे, राहुरी, पाथडी, नगर तालुक्यातील जनतेकडून आपणास मोठा प्रतिसाद मिळाला. जनतेकडून या यात्रेचे मोठे कौतुक झाल्याचे राणीताई लंके यांनी सांगितले.
यावेळी माध्यमांशी बोलताना राणीताई लंके यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गावागावात पोहचवण्याचा उद्देशाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढली. मात्र या दरम्यान आ.निलेश लंके आणि मी असे लंके दांपत्याने तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कामांमुळे लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा आग्रह केला. आम्ही जनतेचे सेवक आहोत त्यामुळे असेल त्यापदावरून काम करत राहणार आहोत. येणारी लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, आता माझ्या उमेदवारी बाबत आ.निलेश लंके आणि पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील असे लंके यांनी स्पष्ट केले. तुमचे “वरिष्ठ” कोण, शरद पवार की अजित पवार या प्रश्नावर राणीताई लंके यांनी यावर “मी सध्या यावर काही बोलू शकत नाही” असे सांगत वरिष्ठ “दादा” की “मोठे साहेब” यावरील सस्पेन्स कायम ठेवला.
सक्कर चौकातून रॅलीस प्रारंभ होऊन टिळक रोड, आयुर्वेद महाविद्यालय, माळीवाडा या मार्गाने ही रॅली बस स्थानक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळयापर्यंत पोहचली. रॅलीमध्ये नगर तालुक्यासह शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.रॅलीदरम्यान नगर शहरवासीयांच्या वतीने ठिकठिकाणी राणीताई लंके यांचा सत्कार करण्यात आला. शिवरायांचे विचार घराघरात, गावागावात पोहचविण्यासाठी राणीताई लंके यांच्यासारख्या महिलेने घेतलेल्या पुढाकाराचे महिलांनी कौतुक करीत पती आ. नीलेश लंके यांच्याप्रमाणेच राणीताई देखील त्यांच्या पावलावर पाउल ठेवून कर्तृत्त्व सिध्द करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी गोरख काळे, शिवाजी पाटील होळकर, भाऊसाहेब काळे, पोपट पुंडे, राजू नरवडे, बी आर कर्डिले, अजय लामखडे, वसंत पवार, हरिदास जाधव, संजय गेरेगे, गणेश साठे, बबनराव डोंगरे, संग्राम गायकवाड, नंदाताई शेंडगे यांच्यासह नगर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.