नगर:
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आज शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. आज सकाळी 11 वाजता खासदार लंके आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसह मातोश्रीवर जाणारा असून उद्धव ठाकरे यांची ते सदिच्छा भेट घेणार आहेत.
मूळचे कट्टर शिवसैनिक असलेले निलेश लंके यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरू झाला. पारनेर तालुक्यात त्यांनी त्यावेळी शिवसेनेच्या शाखांचे मोठे जाळे निर्माण केले. त्यानंतर त्यांना शिवसेना तालुकाप्रमुख हे पदही मिळाले. 2019च्या दरम्यान तालुक्यातील पक्ष नेतृत्वाशी त्यांचे काही कारणास्तव मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने ते विजयी झाले.
खासदार झालेले निलेश लंके यांनी जरी शिवसेना पक्ष सोडला असला तरी त्यांच्या हातावर नेहमी शिवबंधन बांधलेले दिसून येते. याचा ते स्वतः सार्थ अभिमान बाळगतात. शिवसेना पक्षातच मी एक कार्यकर्ता म्हणून घडलो, याच पक्षाने मला पारनेर तालुक्याचे अध्यक्ष पद दिले आणि माझा राजकीय प्रवास यामुळे सुकर झाला. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांशी आजही निलेश लंके यांचे स्नेह मैत्रीचे संबंध आहेत. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांचे पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांची जवळकीचे संबंध राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निलेश लंके यांच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली. पक्षाचे प्रवक्ते आणि फायर ब्रँड खा.संजय राऊत यांनी लंके यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. विजयानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केल्याचे दिसून आले.
2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पारनेर-नगर विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात पारनेर मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे उमेदवार विजय औटी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. त्यानंतरही निलेश लंके निवडून आले आणि महाविकास आघाडी झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे यांनी निलेश लंके यांच्यामध्ये मोठे नेतृत्व गुण संघटन क्षमता असल्याचे कौतुक करत निलेश लंके यांना ओळखण्यात थोडी गफलत झाली अशी कबुलीही देत लंके यांचे अभिनंदन केले होते.
आता अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे सुजय विखे यांचा पराभव करत निलेश लंके यांनी मिळवलेला विजय राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. विखेंसारख्या दिग्गज कुटुंबातील सुजय विखे यांचा पराभव एक सामान्य शिक्षकाच्या मुलाने करून दाखवला याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कौतुक केले आहे. आपली राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झालेली असल्याने आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळाल्याने लोकसभेत विजय मिळवल्यानंतर खासदार झालेले निलेश लंके आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरता मातोश्रीवर जात आहेत.