उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी..
नगर:
राहुरी तालुक्यातील बिबटांची वाढती संख्या व त्यांचेकडून होत असलेली मानवहानी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
पत्रात तनपुरे यांनी, राहुरी तालुक्यात सद्यस्थितीत २५० पेक्षा अधिक बिबट अस्तित्वात आहेत. एक मादि बिबट एका वर्षामध्ये किमान तीन पिलांना जन्म देत असल्यामुळे बिबटांच्या संख्येत प्रत्येक वर्षी लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये बिबटांकडून मानवांवर तसेच पशुधनावर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये मानव तसेच पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.
गेल्या सहा महिन्यांमध्ये मानवी मृत्यु झालेले असून परिणामी वन विभागास नुकसानीपोटी लक्षावधी रूपयांची आर्थिक मदत संबंधीतांना द्यावी लागली आहे. यासाठी तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्र निश्चीत करणे तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बिबटांचे निर्बीजीकरण करणे व त्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांचे अन्यत्र स्थलांतर करणे आवश्यक आहे. कृपया जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आवश्यक उपायोजना करण्यासाठी आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे राहुरी तालुक्यातील बिबटांबाबत आवश्यक उपायोजना करण्यासाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत अशी विनंती प्रसाद तनपुरे यांनी पत्राद्वारे केली आहे.