नगर:
बहुतांशी भारतीयांना चित्रपटाचे जे वेड आहे ते त्यातील कलात्मकतेपेक्षा सिनेमातील मुख्य हिरोच्या जाँबाज पणा मुळे. अन्याय, अत्याचाराने पीडित समाज हा कावेबाज स्वार्थी राजकारणी, भ्रष्ट सरकारी बाबू , बाजारू झालेली आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था, पैशासाठी हपापली पोलीस यंत्रणा, बेलगाम गुंड-दादा यांच्यामुळे पिचलेल्या अवस्थेत व्यवस्थेचा अन्याय सहन करत जीवन कंठत असतो. अशात अचानक एखादा जोशीला जवान व्यवस्थे पुढे सरसावतो. आणि भ्रष्ट, बरबटलेल्या व्यवस्थेला वठणीवर आणतो. एकावेळी पाच-पन्नास गुंडांना लोळावतो. भ्रष्ट पोलिसांना अद्दल घडवतो तर कधी स्वतः पोलीस अधिकारी बनून व्यवस्था ताळ्यावर आणतो. सत्तेसाठी जनतेचा वापर करणाऱ्या पुढाऱ्याला उघडे पाडतो आणि जनतेवर केलेल्या अन्यायाचा बदला ज्या थाटात घेतो की सिनेमा पाहणारे चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनून जातो. रुपेरी पडद्यावरील हे वास्तव नसून नाट्य आहे हे माहीत असूनही मग वास्तवातील एखादा पोलीस अधिकारी थोडीजरी धडाकेबाज कारवाई करतो तर त्याला लगेच जनताच काय तर पेपरवाले पण “सिंघम” ही विरुदावली देत डोक्यावर घेतात. लोकांना चित्रपटातील वास्तव त्यातील अफलातून फायटिंग लुटुपुटूची असते याचीही पूर्ण कल्पना असते. मात्र त्या नाट्यावर तो फिदा होऊन वास्तवात त्या पद्धतीने एखादी व्यक्ती नखा एव्हढी जरी वागली तरी तो त्या व्यक्तीत सिनेमातील “हिरो” अर्थात नेता शोधू लागतो आणि तशा अपेक्षा ठेवू लागतो. आता हे सर्व माहीत असलेले पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे पुण्याच्या कुख्यात गुंड गजा मारणे आणि नवनिर्वाचित खा.निलेश लंके यांची झालेली भेट.
आपल्या देशात राजकारणी आणि फिल्म सेलिब्रिटी यांचे आणि नावाजलेल्या कुख्यात गुंडांशी असलेली सलगी, जवळीक काही लपून राहिलेली नाही. मग कोणत्या नेत्याने कोणत्या घोटाळेबाजासोबत विमान प्रवास केला, दुबईत कोण-कोण पार्टीला गेले, कुणाच्या लग्नात कोणी हजेरी लावली, बॉंबस्फोटातील आरोपी कुणासोबत नाचले असे एक ना अनेक गोष्टी माध्यमातून पुढे येतात किंवा विरोधकाकडून आणल्या जातात. मात्र हमाम मे सब नंगे या युक्ती प्रमाणे सर्वच एकाच्या माळीचे मनी आहेत असे सामान्यजन सहजपणे बोलून जातात आणि ते वास्तवही असते.
असे असले तरी राजकारणात काही अपवादाने का होईना काही व्यक्ती कार्यरत असतात. ज्या आपल्या वागण्या-बोलण्याने आणि कृतीने प्रामाणिक वाटतात आणि अशांना जनता डोक्यावर घेताना दिसते. आता नुकतेच खासदार झालेले पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे कुख्यात गुंड गजा मारणे याला भेटत त्याच्या कडून सत्कार करून घेताना दिसले आणि मोठा गहजब झाला. माध्यमांनी या भेटीला हेडलाईन केले. राजकीय विरोधकांनी तिखट शब्दात टीका करत लंके यांना आणि ते ज्या पक्षाशी संबंधित आहे त्या पक्षातील नेत्यांना धारेवर धरत टीव्हीचा स्क्रीन व्यापून टाकला. आता गजा मारणे हा कुख्यात गुंड असला आणि त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले असले तरी त्याला अनेक राजकीय व्यक्ती भेटतात हे उघड आहे. बर त्याची पत्नी एका राजकीय पक्षात सक्रिय आहे. अनेक गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटका झाली आहे, काही प्रकरणे प्रलंबित असली तरी निकाल लागला नसल्याने कुणाला गुन्हेगार म्हणायचे का? एखादी शिक्षा भोगून झाल्यावर त्या व्यक्तीचे कलंक पुसले जायला नको का? आणि जर कायद्याने तो सध्या केवळ आरोपी असेल तर कोणी भेटलेच तर काय बिघडले असेही म्हणता येईल. या पूर्वी गुंड मारणे याला अनेकजण भेटलेले आहेतच. कुणाची कशी आतून-बाहेरून त्याच्याशी सलगी आहे याची पण चर्चा अधून-मधून होतच असते. मग निलेश लंके यांची भेट झाली तर काय बिघडले? असेही म्हंटले तर त्यात काय वावगे!! मात्र असे असले तरी राजकीय टीका-टिपण्णी बाजूला ठेवून बोलायचे म्हंटले तरी खासदरपदी निवडून दिलेल्या निलेश लंकेंच्या या भेटी बद्दल एकूणच नाराजी व्यक्त होत आहे.
अनेक गुंड बेदरकार वागून टोळ्या तयार करत हत्या, खंडणी, अवैध व्यवसायातून मिळवलेला अमाप पैशाच्या जोरावर नंतर वाल्याचे वाल्मिकी होऊ पाहतात. पण अनेकांचा यात मानभावीपणा असतो. समाजात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळावी म्हणून अनेकजण राजकारणाचा आधार घेण्यास सुरुवात करतात. मोठ्या नेत्यांना हाताशी धरू पाहतात. हातात असलेला बक्कळ पैसा आणि गुंड म्हणून असलेली दहशत याचे आकर्षण आणि फायदा घेण्याचा उद्देशाने चांगले-चांगले राजकारणी अशांच्या नादी लागतात. अनेकांचे राजकारण अशाच गुंड-पुंडांच्या टोळ्यावर सुरू असते. त्यामुळे असल्या राजकीय नेत्यांची प्रतिमाही जनमानसांत चांगली राहत नाही. छोट्या-मोठ्या स्थानिक निवडणुकांत हे सबादून जातही असेल मात्र जेंव्हा तुम्ही राज्यात किंवा थेट संसदेत जाऊन जनतेचे प्रतिनिधित्व करत असाल तर जनतेतून येणाऱ्या प्रतिक्रिया या संबंधितांना बाधक असतात आणि भविष्यातील राजकारणावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या असतात.
समाज हा शांतिप्रिय असतो. त्याला आपला लोकप्रतिनिधी “डॅशिंग” असावा असे जरी वाटत असले तरी तो जर गुंडप्रवृत्तीला जवळ करणारा असेल तर ते त्याला कदापि आवडत नसते. सामान्य जनतेसाठी झगडणारा प्रसंगी समोरच्याला शिंगावर घेणारा लोकप्रतिनिधी जितक्या लवकर पुढे जातो तितक्याच लवकर त्याच्या एखाद्या भले नकळत झालेल्या कृती मुळे मागेही खेचला जाऊ शकतो आणि हे सर्व सामान्य जनतेतून होत असते.
सामान्यजनातून व्यक्त होणारी नाराजीला रंग आहे तो काहीसे आश्चर्य आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचा!! काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील मोठ्या राजकीय धेंडाच्या मांदियाळीत निलेश लंके हे कुणाला ठाऊकही नव्हते. आहे तेच परंपरागत प्रस्थापित राजकीय घराणी आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारी घराणेशाही याच्यापुढे जिल्ह्यातील राजकारण पुढे जात नव्हते. बरं जे एक-दोन नावे पुढे आली ती दोन-तीन टर्म निवडून आल्यानंतर प्रस्थपितांसारखीच दिसू लागली. अशात नगरच्या राजकारणात नवे काही दिसत नव्हते. पण या दरम्यानच पारनेर तालुक्यातील हंगा या छोट्याशा गावात एक निर्भीड नेतृत्व तयार होत होते,घडत होते. एका शिक्षकाचा मुलगा एव्हढी ओळख, साधारण शिक्षण घेतलेला हा तरुण धडपड्या, बोलका, धोरणी आणि उत्तम संघटक आणि म्हंटल्याप्रमाणे निर्भीड होता. या गुणात एका समूहाचे नेतृत्व करण्याचे गुण होते. आणि त्यामुळेच ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशी पदे निलेश लंके नावाच्या तरुणाच्या नावावर अल्प काळात जुळून आली. पुढे जिल्हा परिषद,नियोजन समितीमध्ये लंके यांनी आपल्या धडाडी वृत्तीने स्थानिक पातळीवर नाव केले. हेच नाव काहींना अडचण आणि भविष्यातील धोका वाटू लागली. अंतर्गत राजकारण सुरू झाले आणि लंके यांना जाणीवपूर्वक बाजूला टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. या परिस्थितीत एखादा दुसरा नेता असता तर तो राजकीय दृष्टया संपून गेला असता. पण अंगातील जिद्दीने सोबत जमवले संघटन, तालुक्यातील गावागावात असलेला आपुलकीचा संबंध या शिदोरीवर या नेत्याने हार न मानता “बगावत” केली. क्रांतीचा उद्देश स्वार्था साठी नसून समाजहितासाठी असतो. अनके राजकारणी अशी बगावत करतात मात्र त्यामागे तात्कालिक काहीतरी फायदा हा उद्देश असतो. मात्र निलेश लंके यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला तोंड देत त्यावेळी विकासाचे व्हिजन असलेली जी भूमिका घेतली ती आपसूक त्यांच्या प्रतिमे मुळे पथ्यावर पडली. म्हणतात ना डर के आगे जीत है, त्याप्रमाणे नेते 2019 ला आपला मूळ पक्ष शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झाले. अर्थातच राष्ट्रवादीतील धुरीण नेत्यांनी त्यांच्या कार्यकौशल्याची चुणूक समजल्याने त्यांना उमेदवारी मिळाली आणि पारनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेला “नेत्यां”च्या रूपाने एक “हिरो” मिळाल्याच्या जाणीवेने त्यांना भरभरून मतदान करत आमदार बनवले. तब्बल तीन वेळी आमदार राहिलेले आणि तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले विजय औटी यांचा पराभव करणे सोपे नव्हते, पण निलेश लंकेंनी मिळवलेला विजय राज्यात चर्चेचा ठरला.
पुढे कोरोना काळात निलेश लंके यांनी केलेली कामे सर्वश्रुत आहेत. या मुळे त्यांचे नाव केवळ देशभर जात जगाने त्यांची नोंद घेतली. हे सर्व होत असताना निलेश लंके हे कधीही आणि कुठेही आपल्या नेहमीच्या साध्या राहाणीने आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात जनतेत एक कुतूहल म्हणून कायम राहिले. एक आपल्यातलाच एक सामान्य माणूस ही त्यांची मोठी कमाई म्हणावी लागेल. त्याच जोरावर पक्षाने त्यांना लोकसभेसाठी तयारी करायला सांगितली गेली आणि त्यांनी केलेली तयारी, जनमानसातील सामान्य प्रतिमा, व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा बाणा, समोर कोणीही किती धनदांडगा असला तरी त्याला भिडण्याची हिम्मत या सर्व गोष्टींवर आ.निलेश लंके नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अटीतटीची लढत देत खासदार म्हणून जिंकून आले आणि पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले. राजकारणात तब्बल पन्नास वर्षे आपले पाय रोवून उभे असलेले विखे परिवारातील डॉ.सुजय विखे यांचा त्यांनी पराभव केला, ही सामान्य गोष्ट नव्हती. त्यांना पक्षातूनच नव्हे तर पक्षातीत अनेकांनी मदत केली असेलही, पण त्यांचा विजय हा सर्वसामान्य जनतेने खऱ्या अर्थाने केला हे ते स्वत:ही नाकारत नाहीत.
आता निलेश लंके यांच्या समोर खासदार म्हणून अनेक आव्हाने आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एनडीए सरकार आहे. आणि लंके हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत. प्रचारकाळात त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण करणे हे त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे. लंके यांच्याकडे एक योद्धा म्हणून पाहिले जाते, आणि ते जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील असा आशावाद जनतेत आहे. या परस्थितीत आपली कमावलेली प्रतिमा जपणे लंके यांना क्रमप्राप्त आहे. मात्र त्यांनी एका कुख्यात गुंडा कडून घेतलेला सत्कार-सन्मान जनतेला रुचलेला नसणार आहे. प्रचार काळात विरोधकांनी त्यांच्यावर सुपा एमआयडीसी मुद्यावर दहशत,खंडणी असे आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केले होते. स्वतःच्या पारनेर तालुक्यातूनच त्यांना काहींनी प्रखर विरोध केला. अनेक घटना या अनुचित होत प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत गेली. निवडणुकीच्या निकालानंतरही हाणामाऱ्या मुळे पारनेर आणि दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते चर्चेत राहिले आणि कुठेतरी यात ओघानेच निलेश लंके यांचे नावही जोडले गेले, तसे आरोप विरोधकांनी केले आहेत. एकूणच हे सर्व सुरू असताना कुठे तरी राजकीय संघर्ष थांबून आता लोकसभा मतदातसंघात खा. निलेश लंके काय करणार? संसदेत पदार्पण केल्यावर कामकाजात ते कसा भाग घेणार, दिलेल्या आश्वासनांसाठी ते लंके स्टाईल पहिले पाऊल काय उचलणार? आदी गोष्टींची उत्सुकता जिल्ह्याला आहे. नगर मध्ये पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात खुद्द शरद पवार साहेबांसमोर निलेश लंके यांनी आपल्या खास शैलीत धडाकेबाज भाषण केले. साहेबांनी पण निलेशजी संसदेत काय करतील हे सांगता येत नाही, असे म्हणत त्यांचे कौतुक करताना विशेष अपेक्षा ठेवल्याचे दिसून आले. हे सर्व पक्षाला आणि निवडून देणाऱ्या जनतेला अपेक्षित असताना त्यांची एका नामचीन गुंडाची भेट होणे आणि त्याच्याकडून सत्कार स्वीकारणे धक्कादायक मानले जात आहे.
निलेश लंके हे आतापर्यंत संघर्ष करत पुढे आलेले नेतृत्व आहे. आता ते जिल्ह्याची ओळख असलेले राज्य आणि देशाच्या राजकारणात उतरलेले आहे. आता पर्यंत त्यांनी जिथे हात टाकला तिथे त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळेच हे यश, कीर्ती,प्रसिद्धी टिकवून ठेवताना त्यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करताना जनतेला पहायचे आहे. लंके यांना राजकारणात खूप मोठा “स्पँन”(अवकाश) आहे. यासाठी त्यांना आपल्या जमेच्या बाजू शाबूत ठेवाव्या लागणार हे क्रमप्राप्त या साठी आहे की त्यांच्या समोर असलेले विरोधक दिग्गज आणि प्रस्थापित आहेत. अशात कसल्याही तात्कालिक कारणाने भले ते म्हणतात तसे नकळत कुणा अप्रवृत्तीला भेटले असले तरी त्याचे मोठे भांडवल होत त्यांना स्वतःसह त्यांच्या पक्षाला उत्तरदायित्व असणार आहे. उगाच छोट्या-मोठ्या घटना लक्षात ठेवून त्यांना आता या पुढील राजकारण करणे त्यांच्या प्रतिमेला आणि पुढील मोठ्या भविष्याला हानिकारक ठरणारे असू शकते. जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांना पुढील वाटचाल करावी लागणार आहे.