आपण नव्याने कोणतीही याचिका अगर मागणी केली असल्याचे वृत्त अण्णांनी फेटाळले.
नगर:
शिखर बँक आर्थिक घोटाळा चौकशी बाबत सरकारने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट मुंबई सत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या क्लोजर रिपोर्टला हरकत घेण्यात आल्याच्या वृत्तात समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव आले आहे. संबंधित याचिकेची सुनावणी २९ जून रोजी होणार आहे. मात्र क्लोजर रिपोर्ट बाबत आपण कोणतीही हरकत घेत याचिका दाखल केली नसल्याचा मोठा खुलासा स्वतः अण्णांनी केला आहे. १३-१४ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून आपणाला याबाबत सध्या काय सुरू आहे हे माहीत नसून मला वृत्तपत्रातील बातम्यांतुन मी हरकत घेतल्याचे समजले असल्याचे स्पष्ट करताना आपण अशी कोणतीही हरकत घेत याचिका दाखल केल्याचा इन्कार केला. माझे नाव या याचिकेत कसे आले याची माहिती नसल्याचे सांगत हे चुकीचे असल्याचे हजारे यांनी सांगितले.
सन २००१ ते २०१३ दरम्यान राज्य शिखर बँकेत दोन हजार कोटींवर कर्ज वाटपात मोठा घोटाळा झाल्याचे पुढे आले होते. या बाबत सरकारच्या विविध संस्था आणि विभागाने ठपका ठेवला होता. या नंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, आनंदराव अडसूळ आदी विविध पक्षांच्या ७६ व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला होता आणि चौकशी सुरू झाली होती. मात्र त्यानंतर या चौकशी बाबत आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. राज्यातील सरकार बदलत गेले तसे कधी पुन्हा चौकशी तर कधी अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. अजित पवार सरकार मध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा याच पद्धतीने क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर पाच जनांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली असून यात माध्यमातून समाजसेवक अण्णा हजारे हे एक याचिकाकर्ते असल्याचे म्हंटले गेले आहे. मात्र याबाबत अण्णांशी संपर्क केला असता त्यांनी स्पष्ट शब्दात सध्या दाखल केलेल्या याचिकेबाबत कानावर हात ठेवत याबाबत आपण कसलीही याचिका दाखल केली नसल्याचे सांगितले. हे प्रकरण फार जुने असल्याचे सांगत दरम्यान या प्रकरणाचे काय झाले याची माहिती नसल्याचे अण्णांनी सांगितले.
आण्णा आता जागे झाले!!
-याबाबत हजारे यांना विरोधी पक्षातले लोकं आण्णा आता कसे जागे झाले असे प्रश्न उपस्थित करत असल्याबद्दल विचारले असता त्यांनी, हे चुकीचे आरोप असल्याचे सांगत ज्या गोष्टीची मला कल्पनाच नाही त्या बद्दल कसे बोलणार एव्हढीच त्रोटक प्रतिक्रिया दिली.