शेवटी वळणाचं पाणी वळणालाच जातं…
नगर: https://x.com/ChitraKWagh/status/1801582524533248314?t=7OxCMMCScH0AJpL-XWKDLw&s=19
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अहिल्यानगरचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खा.निलेश लंके यांच्या कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पुण्यातील भेट आणि सत्कार स्वीकारल्याबद्दल कडवट शब्दात टीका केली आहे. “शेवटी वळणाचे पाणी वळणावर जाते” या उक्तीचा आधार घेत लंके यांना सूचक शब्दात सुनावले आहे. खा.लंके यांनी, गुंड मारणे याची झालेली भेट अपघाताने झाली असून ही चूक झाली असल्याचे स्पष्टीकरण दिले असले आणि आ. रोहित पवार यांनीही खा.लंके यांच्या वतीने सारवासारव करत त्यांच्या कडून नकळत चूक झाली असल्याचे सांगतानाच ते पक्षाचे खासदार असल्याने आपण माफी मागत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या नंतरही दिवसभरात खा. निलेश लंके यांच्यावर आ.अमोल मिटकरी, उमेश पाटील, चित्रा वाघ यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निमित्ताने अवघ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घेरल्याचे दिसून येत आहे. आपल्या एक्स फॉरमॅट वर याबद्दल चित्रा वाघ यांनी खा.निलेश लंके यांच्यावर निशाणा साधत नुकत्याच पारनेर तालुक्यात घडलेल्या आणि पोलीसात गुन्हा दाखल झालेल्या घटनांचा संदर्भ देत तिखट शब्दात टीका केली आहे.
चित्रा वाघ यांच्या एक्स फॉरमॅट वरील(ट्विट)प्रतिक्रिया):
“परवा या @nileshlanke_ नवनिर्वाचित खासदार महोदयांच्या गुंडांनी एका गर्भवती भगिनीला पोटावर लाथा मारल्या, मारहाण केली, जातिवाचक शिवीगाळ केली. एका असहाय आणि दलित महिलेची विटंबना करणे, यालाच ते पराक्रम समजत असावेत…
म्हणूनच आज त्या पराक्रमी कृत्याबद्दल त्यांनी स्वतःचा सत्कार करून घेतला असावा. कदाचित आपल्या तोडीस तोड नग असावा, म्हणून एका गुंडाकडून ते हा सत्कार स्वीकारताना दिसताहेत…
आणि त्यांच्या पक्षाच्या मोठ्ठ्या ताई राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मगरीचे अश्रू ढाळताहेत.
यावरूनच स्पष्ट होतं की, यांना ना त्या गर्भवती दलित महिलेच्या अब्रूची चाड, ना कायदा-सुव्यवस्थेचा आब…”