नगर:
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचा शपथविधी रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी होणार असून देशभरातील अनेक मान्यवरांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत, यामुळे या शपथविधीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे. भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, तथा अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक प्रा भानुदास बेरड यांना शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
प्रा.बेरड यांच्या कडे शांत, मितभाषी, अभ्यासू, संयमी आणि पक्षाशी एकनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून आदराने पाहिले जाते. पक्षांतर्गत कितीही गटतट आणि मतभेद असो, त्यावर सर्वांशी जुळवून घेत पक्ष संघटनेला पुढे नेण्याचे कौशल्य त्यांनी सिद्ध केले आहे. पक्षाचा पडता काळ असला तरी त्यांनी एकनिष्ठ राहत पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर 2014 पासून पक्ष सत्तेत असताना आणि पक्षात अनेक आयाराम आलेले असताना सर्वांशी एकोपा साधला आहे.
पक्ष संघटनेचे काम अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने करत असताना सत्तेतील कोणतेही मोठेपद त्यांना अद्याप मिळालेले नाही. लोकसभेसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. असे असले तरी कुठलीही जाहीर नाराजी मनात न ठेवता त्यांनी पक्षाचा पाईक म्हणून काम केले. केवळ भाजप पक्षातच नव्हे तर इतर सर्वच पक्षातील विरोधक त्यांच्या कडे आदराने पाहतात. त्यामुळे प्रा.बेरड सरांना पक्षाकडून आवर्जून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिले आहे.