नगर:
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे सुजय विखे विरुद्ध महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यातील लढत राज्यात लक्षवेधी ठरत आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासमोर पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र असताना आज मतदारसंघातील हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यात सुजय विखेंसाठी अजित पवार तर निलेश लंकेसाठी सुप्रिया सुळे मैदानात प्रचाराच्या रणधुमाळी उतरणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीमुळे या आधीच शरद पवार विरुद्ध अजित पवार या राष्ट्रवादी पक्षाच्या गटांमध्ये तुंबळ राजकीय रणधुमाळी उडालेली असतानाच त्याचीच प्रचिती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी शरद पवारांनी नगर जिल्ह्यात जातीने लक्ष घातलेले आहे. शरद पवार यांच्या आतापर्यंत विविध ठिकाणी सभा झाल्या असून सुजय विखे यांच्या पराजयासाठी पवारांनी नगर दक्षिणेत शड्डू ठोकल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनीही आपली पूर्ण “विखे” यंत्रणा मतदारसंघात कामाला लावली असून सभांचा धडाका ठेवलेला आहे.
तीन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार सभा नगर शहरात पार पडली आहे. त्यानंतर सर्वांचे लक्ष असलेले अजित पवार यांची सभा आज शुक्रवारी पारनेर शहरात होत आहे. राष्ट्रवादी पक्षातील फुटी नंतर आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात जाणे पसंत केले होते. मात्र लोकसभा निवडणूक घोषित होतात निलेश लंके यांनी अजितदादांना बाय-बाय करत शरद पवार गटात साग्रसंगीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडी कडून उमेदवारी पदरात पाडून घेतली. यामुळे एकूणच नगदक्षिणे मधील लढत केवळ विखे विरुद्ध लंके न राहता शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत असून त्याला शरद पवार विरुद्ध विखे परिवाराची परंपरागत राजकीय संघर्षाची मोठी झालर असल्याने आज प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये पारनेर तालुक्यात होत असलेल्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सभांकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
या सभेच्या निमित्ताने अजित पवार भाषणात काय बोलणार याची मोठी उत्सुकता निश्चित असणार आहे. निलेश लंके यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडली. त्यामुळे ही मोठी सल अजितदादांच्या मनात असणार असून आपली खदखद ते आपल्या भाषणातून निश्चितपणे व्यक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दोन दिवसापूर्वीच मंचर मधील सभेत अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर खोचक शब्दात तोफ डागली आहे. निलेश लंके यांना मी राष्ट्रवादी पक्षात आणले, ते काळे की गोरे हे शरद पवार साहेबांना माहीतही नव्हते. मी त्यांना उमेदवारी दिली निवडून आणले, शेकडो कोटींचा निधी मी त्यांच्यासाठी मतदारसंघात दिला. मात्र ऐनवेळी त्यांनी आमची साथ सोडली, अशी खंत अजित पवारांनी आपल्या खास शैलीत व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आज थेट निलेश लंके यांच्या होम ग्राउंडवरच अजितदादा कशा पद्धतीने निलेश लंके आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यावर कडाडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
तर दुसरीकडे पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे निलेश लंके यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची सभा होत आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या(शरद पवार गट) अध्यक्षा सक्षणा सलगर, स्टार प्रचारक यशवंत गोसावी हे उपस्थित असणार आहेत. या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अजित पवारांच्या सभे नंतर सुप्रिया सुळे यांची सभा होणार असल्याने त्या अजित पवारांच्या भाषणाचा कसा समाचार घेतात याचीही उत्सुकता असणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यात सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या या सभांच्या निमित्ताने मोठा राजकीय दारुगोळा आज फुटणार असल्याने या दोन्ही सभांकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.