नगर:
अजित पवार.. राज्याच्या राजकारणातील एक “दादा” माणूस.. अजितदादांनी शब्द दिला म्हणजे काम होणारच, आणि नाही म्हंटले तर कितीही आपटा!! अशी दादांची ख्याती. काम होणार असेल तर हा म्हणणारे दादा अगदी भिडस्त स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. जे काही असेल ते जागेवर.. तोंडावर आणि सडेतोड बोलणारे अजितदादां जर कुणावर सटकले तर त्याची खैर नाही अशी दादांची ओळख. 2019 च्या निवडणुकीत, शरद पवारांवर टीका करणाऱ्या विजय शिवतारेंना, सूर्यावर थुंकू नको असे सांगत जाहीर सभेत ‘ यंदा बघतोच, तू कसा आमदार होतो” असा गर्भित इशारा देत शिवतारेंना पराभवाचा दणका देत आपला शब्द खरा करून दाखवला होता.
तब्बल पाच वेळा अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. आज सत्तेत वा विरोधात असलेल्या पक्षांच्या सरकारमध्ये अजितदादांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा हा पराक्रम रचला आहे. हेच दादा आज नगर जिल्ह्यात पारनेर मध्ये येत आहेत.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी कर्जत आणि पारनेर शहरात जाहीर सभा होत असून या सभेचे मुख्य आकर्षण असणार आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाषणासाठी फायरब्रॅंड असलेले अजितदादां पवार!! निवडणूक सुरू होताना होणारी लढत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी होणार हे स्पष्ट होताच सर्वांना वेध लागले होते ते अजित पवार यांच्या सभेचे. दादा सभेला येणार का? येथ पासून ते आले तर काय बोलणार?? आपल्या पक्षाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडून गेलेले निलेश लंके यांच्यावर अजितदादा कसे आणि कोणत्या शब्दात सटकणार?? याची मोठीच उत्सुकता जिल्हाभर लागून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर मूळ राष्ट्रवादी पक्षातून चाळीसवर आमदार अजित पवार यांच्या गटात सोबत गेले. यात नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी चार आमदार अजितदादांसोबत गेले. यात पारनेरचे आ.निलेश लंके यांची मोठी चर्चा झाली. लंके साहेबांसोबत थांबणार की दादांसोबत जाणार ही उत्सुकता असताना मतदातसंघातील विकासकामांच्या निधीसाठी सत्तेत असलेल्या अजित पवारांसोबत जाण्याचा जाहीर निर्णय निलेश लंके यांनी घेतला. जवळपास आठ महिने ते महायुती सरकारमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिले. या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री असलेल्या अजितदादांच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी पारनेर-नगर मतदातसंघासाठी पदरात हक्काने पाडून घेतला. लंके आपल्यासोबत आल्याने खुश असलेल्या अजितदादांनी पण लंकेंना निधी देताना हाथ आखडता घेतला नाही. मात्र जवळपास दोन-अडीच वर्षांपासूनच लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुका घोषित होताच अजितदादांना टाटा-बायबाय केला आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले. निवडणूक लढवायचीच असा चंग बांधलेल्या लंके यांनी कोणतीही तांत्रिक व कायदेशीर अडचण नको तसेच अजितदादांनी पक्ष सोडला तर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाईची तंबी दिल्याने लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. अजितदादांनी प्रयत्न करून समजावून सांगूनही निलेश लंके यांनी खासदारकी लढायचीच या हट्टाने अजित पवारांना जुमानले नाही.
आता या पार्श्वभूमीवर निलेश लंके हे महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात अजितदादां ज्या महायुतीत आहेत तेथून भाजपचे सुजय विखे हे उमेदवार आहेत. यामुळे आज शुक्रवारी अजित पवार नगर जिल्ह्यात सुजय विखे यांच्या प्रचाराकरता कर्जत आणि कळीचा मुद्दा असलेल्या निलेश लंके यांच्या होमग्राऊंड असलेल्या पारनेर मध्ये येत आहेत. त्यामुळे भरगोस आर्थिक निधीची मदत करूनही ऐनवेळी साथ सोडलेल्या निलेश लंके यांच्या विरोधात अजित पवारांची तोफ कशी आणि कोणत्या शेलक्या शब्दात धडाडणार याची उत्सुकता जिल्ह्यात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना अजितदादांनी, यंदा तू कसा निवडून येतो ते बघतोच.., असा इशारा दिला होता. त्यानंतर कालच अजितदादांनी आ.अशोक पवारांवर अशाच शब्दात तोफ डागताना, मंत्री व्हायला निघालाय, पण तू आमदारच कसा होतो ते बघतोच, या शब्दात सज्जड इशारा दिला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी नगर जिल्ह्यात कर्जत आणि हॉटस्पॉट असलेल्या पारनेर मध्ये होणाऱ्या सभेतून अजितदादां कसे धडाडणार याबद्दल मोठे कुतूहल आणि उत्सुकता जिल्ह्याला लागून आहे.