शिर्डी:
काँग्रेस पक्षाचा त्याग करत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत दाखल झालेल्या उत्कर्षा रुपवते वंचित कडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन निवडणुकीच्या रणांगणात दाखल होत आहेत. बुधवारी रात्री अकोल्यात(बाळापूर) वंचितच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर 24 तासाच्या आत गुरुवारी वंचित कडून त्यांची अधिकृत उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे शिर्डीची लढत दुरंगी न राहता आता तिरंगी होणार आहे.
अर्थात उत्कर्षा रुपवते यांच्या एंट्रीने शिर्डीची लढत रंगतदार होणार असून उत्कर्षा यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आपल्या समोर एक आजी खासदार तर एक माजी खासदार असताना आपल्या उमेदवारीकडे कसे पाहता? या प्रश्नावर त्यांनी, “ना आजी ना माजी, शिर्डीतून उत्कर्षा रुपवतेच मारणार बाजी” असे सूचक वक्तव्य करत आपल्याला विजयाची खात्री असल्याचा विश्वास व्यक्त केला.
गेल्या 10 वर्षातील विद्यमान खासदार यांच्या कामावर जनता नाखूष असल्याचे चित्र पुढे आलेले आहे. कोणतेही विकासाची कामे केंद्रात सत्ता असतानाही विद्यमान खासदार आणू शकले नाहीत. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यावर ना त्यांनी संसदेत प्रश्न सोडवले ना जनतेत ते कधी दिसले अशी ओरड जनतेतूनच आहे. दुसरीकडे माजी खासदार राहिलेल्या उमेदवाराने त्यांच्या कार्यकाळात काय भरीव काम केले हा प्रश्न आहे. एकूणच आजी-माजी खासदार असलेले उमेदवार केवळ चर्चेत राहिले असले तरी आता माझ्या उमेदवारीच्या घोषणेनंतर मला जनतेतून मोठा पाठिंबा व्यक्त केला जात आहे. मी भूमीकन्या असून रुपवते परिवार समाजाशी नेहमीच एकरूप राहिला असल्याने आम्हाला विजय सोपा असल्याचा विश्वास उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलो. वास्तविक शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे दोन आमदार असून पक्ष संघटन मजबूत आहे. मात्र असे असले तरी काँग्रेस पक्षाला शिर्डीची जागा सुटली नाही. शिर्डीची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी राज्य पातळीवर तसेच जिल्ह्यातून जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले. मात्र शिवसेनेचे उमेदवार खासदार राहिले असल्याने त्यांना जागा देण्यात आली. वास्तविक सांगली साठी पक्ष संघटनेने जी एकत्रित ताकत अजून कायम ठेवली असताना शिर्डीसाठी मात्र त्या पातळीवर प्रयत्न झाले नसल्याची खंत आणि सल उत्कर्षा रुपवते यांनी यावेळी व्यक्त केली. बाळासाहेब थोरातांनी जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
जिल्ह्यात आता पर्यंत एकही महिला खासदार निवडून आलेली नाही. नगर दक्षिणेत किमान काही महिला उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग घेतला, मात्र शिर्डीतून एकही राजकीय पक्षाने आतापर्यंत महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर वंचित कडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी घोषित होणे महत्वपूर्ण मानले जात आहे.