नगर:
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने निलेश लंके हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन सभा घेत आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.
परंतु त्यांच्यासोबत असणाऱ्या स्थानिक नेत्यांमुळे त्यांना विरोधही होत आहे. आता याच पार्श्वभूमीवर एक बातमी आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील लिंपणगाव येथे आयोजित निलेश लंके यांची सभा स्थानिकांच्या गोंधळानंतर उधळली गेली आहे.
तेथे नागरिकांनी स्थानिक नेत्यांवर कोट्यवधींचा निधी मागे पाठवल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्यामुळे लंके यांनी सभा न घेता तेथून जाणे पसंत केले असे बोलले जात आहे.
समजलेली माहिती अशी की निलेश लंके हे लिंपणगाव येथे सभेसाठी गेले होते. त्यांच्यासोबत काही स्थानिक नेतेही होते. तेथील नागरिकांनी या स्थानिक नेत्यांवर आमदार व खासदार निधीतून आलेला पैसा मागे लावल्याचा आरोप केला.
त्यानंतर लंके यांना सभा घ्यायची असेल तर या स्थानिक नेत्यांना येथून जायला लावा आणि मगच सभा घ्या असा आग्रह धरला. यातूनच गोंधळ वाढत गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान वाढत्या गोंधळानंतर आ. लंके यांनी तेथून काढता पाय घेतला व सभा घेणे टाळले अशीही चर्चा समाज माध्यमातून पुढे आली, याबाबतचा एक कथित व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची पृष्ठी न्यूजनगरी करत नाही. मात्र सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.