नगर:
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगांव इथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामुळे एक कोटींचा स्थानिक विकासनिधी परत गेल्याच्या रोषातून लंके यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करत विरोध केल्याच्या आशयाची एक कथित व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले. मात्र याबाबत आता निलेश लंके यांच्या समर्थनार्थ मविआ मधील श्रीगोंदा तालुक्यातील नेते एकत्र येत, लिंपणगाव मधील त्या वादाशी लंकेंचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
नीलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रा लिंपणगांव येथे पोहचल्यानंतर लंके तसेच इतरांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर तिथे आयोजित करण्यात आलेला जेवणाचा कार्यक्रम उरकत येत असताना तरूणांच्या दोन गटामध्ये स्थानिक प्रश्नावरून वाद झाला. त्या वादाशी लंके यांचा काडीचाही संबंध नसल्याचे माजी आ.राहुल जगताप, जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार व शिवसेना नेते साजन पाचपुते यांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी हा वाद झाल्यानंतर या वादाचे व्हिडीओ व्हायरल करून लंके यांना सभा न घेताच लिंपणगांवमधून काढता पाय घ्यावा लागल्याच्या खोटया बातम्या विरोधकांकडून जाणीवपुर्वक पसरविण्यात आल्या. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नीलेश लंके यांनी १ एप्रिलपासून मतदारसंघात स्वाभीमान जनसंवाद यात्रा सुरू केली असून मोहटादेवी गटावरून सुरू झालेल्या या यात्रेस तालुक्या तालुक्यांमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तसाच प्रतिसाद श्रीगोंदे तालुक्यातील गावागावांमध्येही मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून लंके यांची ही यात्रा बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचले जात असल्याचे सांगण्यात आले.