सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरील टिकेनंतर जयंत पाटलांचे प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर..
नगर:
दुसऱ्याचा आदर करणे ही भारतीय संस्कृती आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार नात्यातला असला तरी सुप्रिया सुळेंनी आई समान वहिनीला माझ्या विरोधात उतरवल्याबद्दल मत व्यक्त केले असेल तर ती एक भारतीय संस्कृती आहे, याचा अर्थ सुप्रियाताईंनी निवडणूक लढवू नये असा होत नाही. त्या पूर्ण ताकतीने निवडणूक लढतील आणि जिंकतील असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. आई समान वहिनीला माझ्या विरोधात भाजपने उभे केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. त्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी जर वहिनी आईसमान आहेत तर त्यांच्या विरोधात लढू नये, असे प्रतिउत्तर दिले होते.
महाविकास आघाडीचे अहमदनगर दक्षिणेतील उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोहटादेवी गडावर दर्शन आणि त्यानंतर स्वाभिमान जन संवाद यात्रा सुरू करण्यात येऊन करण्यात आला. यावेळी जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा विषय आता मिटला असून एक-दोन जागांवर थोडे समज-गैरसमज आहेत ते एकदोन दिवसांत मिटतील असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले. निलेश लंके हे जनतेसाठी झटणारे नेतृत्व आहे. समोर कितीही मोठा उमेदवार उभा असल्याचे वाटत असले तरी जनतेने लंके यांच्या विजयासाठी निवडणूक हातात घेतली आहे. ही निवडणूक एकतर्फी होणार असून निलेश लंके मोठया मताधिक्याने जिंकून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडीतील अनेकजन भाजपच्या संपर्कात असल्याने आघाडीत बिघाडी होणार असल्याचे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे, यावर बोलताना जयंत पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत आघाडीत बिघाडी होणार नाही, आघाडीत बिघाडी होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत पण सगळ्यांचा भ्रमनिरास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातील संविधान धोक्यात आहे, लोकशाही जाऊन हुकूमशाही येतेय का अशी शंका व्यक्त केली जात आहे, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी तयार केली आहे. या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी यावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आलो आहोत. मात्र संविधान वाचले पाहिजे या भूमिके सोबत प्रकाश आंबेडकरांना येण्याबाबत त्यांची भूमिका वेगळी दिसून येत आहे. मात्र आम्हांला अजूनही वाटते की प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील असा आशावाद जयंत पाटील यांनी वंचितचे 19 उमेदवार घोषित केल्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
चौकट:
जिल्ह्यातल्या राजकीय दहशतवादा विरोधात निलेश लंके उतरले आहेत, ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आदित्य ठाकरे यात्रेच्या समारोपाला येणार आहेत. मी स्वतःही मधल्या काळात जाहीर सभा घेण्यास येईल. निलेश लंके हे येणाऱ्या लोकसभेत दिसतील असा विश्वास खा.संजय राऊत यांनी दूरध्वनीवरून आपला संदेश उपस्थितांना ऐकवला.