महाराष्ट्राला छत्रपतींचे बाळकडू, पण आमच्या कडून तिकडे गेलेल्या सरदारांनी दिल्लीत लाचारी पत्करली -जयंत पाटील
नगर:
कामासाठी तिकडे जातोय, असे सांगून आमच्या कडील अनेक सरदार तिकडे लाचारी पत्करत आहेत. राजकारणात आचार विचार गरजेचा आहे. राज्याला पुढे नेण्याचे काम राहुल गांधी, उद्धव ठाकरे,शरद पवार हे करणार आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या सोबत राहिले पाहिजे. तिकडे गेलेले सरदार त्यांना आज दिल्लीच्या दरबारात चौथ्या-पाचव्या रांगेत उभे राहावे लागताना पहावे लागत आहे. आपल्यावर होणाऱ्या कारवाया पाहता सगळ्यांच्या चढाया होतील,पेशवाईच्या पण होतील पण दिल्ली समोर झुकायचे नाही हे पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांचा बाणा आहे.
चार दिवस छत्रपती उदयनराजे दिल्लीत राहिले पण भेट दिली नाही, महाराष्ट्राला स्वाभिमानाचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराज,चैत्र संभाजी महाराज यांनी दिले आहे हे विसरू नका, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. नगर दक्षिणेतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा नारळ आज मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी वाढवण्यात आला.
यावेळी झालेल्या प्रचार शुभारंभ सभेत बोलताना जयंत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. प्रचार शुभारंभ सभेस जेष्ठ नेते अंकुश काकडे, आ.प्राजक्त तनपुरे, आ.लहू कानडे, प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे,शिवसेना नेते साजन पाचपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, अभिषेक कळमकर, किरण काळे, प्रवीण दळवी,योगिता राजळे,रत्नमाला उदमले आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकांनीच एखादे नेतृत्व खांद्यावर घेतले आणि ठरवले तर जगातील कोणीही त्याला थांबवू शकत नसते, म्हणून हा उत्साह पाहून आजच निकाल लागलाय आणि निलेश लंके निवडून येणार असे म्हणावे लागेल असा विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. कोरोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या हाताळणी मुळे पन्नास लाखावर माणसे दगावली. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत शेती,पाणी, विद्यार्थी ,रस्ते अनेक प्रश्न मतदारसंघात आहेत. त्यासाठी लंके लोकसभेत हवेत. सर्व घटकांना ते न्याय देतील, आपल्या भागातला उमेदवार निवडून देऊ म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी दूर जावे लागणार नाही असे म्हणत जयंत पाटील यांनी सुजय विखेंवर निशाणा साधला.
इलेक्ट्रोल बॉंड वरूनही पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली.