शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संजय खामकर यांचा गौरव
अहमदनगर:
समाजसेवेचे व्रत घेतल्यास आपण कुटुंबाचे राहत नाही. समाज हाच कुटुंब बनतो. समाजहितासाठी संघर्ष करून चळवळ उभी करणे ही समाजाची गरज बनली आहे. अशा चळवळी उभ्या राहिल्यास समाज जिवंत राहतो. संजय खामकर सामाजिक चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने संजय खामकर यांना राज्यस्तरीय संत रविदास महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात पद्मश्री पवार बोलत होते. शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या गौरव सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रतनलाल सोनाग्रा, अर्शद शेख, ॲड. संतोष गायकवाड, ज्ञानदेव पांडुळे, जालिंदर बोरुडे, अभिजित पोटे, तारकराम झावरे, सुनील गोसावी, किसनराव पायमोडे, प्रा. सिताराम काकडे, सुभाष सोनवणे, रामदास सोनवणे, मच्छिंद्र दळवी, सर्जेराव गायकवाड, मनिष कांबळे, रुपेश लोखंडे, अरुण गाडेकर, रामदास सातपुते, कारभारी देव्हारे, सुखदेव इल्ले, शर्मिला गोसावी, ॲड. अनुराधा येवले, गोरख वाघमारे, संजय गुजर, दिनेश देवरे, संतोष कंगणकर, अण्णा खैरे, विनायक कानडे, संतोष कांबळे, अमोल डोळस, मनोज गवांदे, संदिप सोनवणे, संदिप डोळस, दिलीप कांबळे आदींसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, संत रविदास महाराजांनी कालमार्क्स अगोदर आदर्श समाजवाद मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरुस्थानी मानले. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेतून रविदास महाराजांचे विचार उमटले आहेत. प्रजासत्ताकाचे गणराज्यात रुपांतर होण्यासाठी सामाजिक, आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे. यासाठी समतेवर आधारित राष्ट्र उभारणी रविदास महाराजांच्या विचाराणे शक्य असून, त्यांचे विचार घरोघरी पोहचविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करुन, पर्यावरणाचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी निसर्गाला शरण जाण्याचे त्यांनी आवाहन केले.
पद्मश्री पवार व ज्येष्ठ साहित्यिक सोनाग्रा, यांच्या हस्ते खामकर यांना मानपत्र प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजभूषण संजय खामकर गौरव सोहळा समितीच्या पुढाकाराने पीस फाउंडेशन, पारनेर मित्र मंडळ, आधार फाउंडेशन, मानवता सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, खानदेश मित्र मंडळ, शिवगर्जना, ए.के. सामाजिक प्रतिष्ठान, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्यिक परिषद, मानवाधिकार अभियान, सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, फिनिक्स सोशल फाउंडेशन, प्रहार संघटना, निसर्ग मित्र समिती, कृषी मित्र परिवार, गुरु रविदास क्लब, चर्मकार विकास संघ व लोकनेते मा.आमदार सितारामजी घनदाट मामा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी खामकर यांचा सत्कार केला. आमदार संग्राम जगताप यांनी या कार्यक्रमास भेट देवून खामकर यांचा सन्मान करुन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना संजय खामकर म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने व प्रेरणेने हा पुरस्कार मिळाला आहे. शाहू, फुले, आंबेडकर विचाराने समाजात कार्य सुरु असून, माजी आमदार सीताराम घनदाट यांच्या प्रेरणे सामाजिक कार्याला प्रारंभ करुन समाजाच्या विकासासाठी चळवळ उभी केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रतनलाल सोनाग्रा यांनी आनंदात सहभागी होणारे कमी व दुःखात सहभागी होणारे जास्त असतात. कारण इतरांच्या दुःखात काहींना अधिक आनंद वाटत असतो, ही माणुसकी नव्हे. आनंदात सहभागी होवून दु:खाच्या काळात धावून जाणे ही खरी माणुसकी असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात सुभाष सोनवणे म्हणाले की, चर्मकार समाजात संघर्षमय जीवन जगून माणसांना माणूस म्हणून जोडण्याचे कार्य संजय खामकर यांनी केले. नोकरीचा त्याग करून त्यांनी समाजसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले असल्याचे सांगितले. ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, आजही समाजात वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था पूर्वीप्रमाणे अस्तित्वात आहे. तर टोकाची आर्थिक विषमता पसरत चालली असून, ही विषमता दूर करण्यासाठी खामकर यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. नोकरी सोडून समाजकार्यासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्याच्या कार्याला अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले. किसन पायमोडे यांनी पारनेर तालुक्याचे भूषण असलेले संजय खामकर राज्यभर सामाजिक चळवळ चालवित असून, सर्वांना त्यांचा अभिमान असल्याचे सांगितले.
अर्शद शेख म्हणाले की, ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे, त्या वेगाने माणुसकी हरवत चालली आहे. मात्र प्रामाणिकपणे पुरोगामी विचारणे समाजकार्य करणाऱ्यांमुळे समाज सावरला आहे. खामकर यांचे कार्य देखील समाजाला दिशा देण्याचे कार्य करत असल्याचे, ते म्हणाले. प्रा. सिताराम काकडे यांनी समाजातील प्रत्येक घटक खामकर यांच्या जोडला गेलेला आहे. स्वयंप्रेरणेने त्यांचे समाजकार्य सुरू असल्याचे स्पष्ट केले. अभिजीत पोटे यांनी नेता म्हणून नव्हे तर सेवक म्हणून खामकर कार्य करत असल्याचे सांगितले. यावेळी सुनील गोसावी, सुखदेव ईल्ले, ॲड. अनुराधा येवले यांनी आपल्या भावना व्यक्त करुन खामकर यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले. आभार ॲड. संतोष गायकवाड यांनी मानले.