नगर:
मागील विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीतील पराभवापासून विखे पिता-पुत्रांवर काहीसे नाराज असलेले आ.राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. रविवारी रात्री सागर बंगल्यावर फडणवीस, राधाकृष्ण विखे, राम शिंदे, सूजय विखे यांच्यात बैठक पार पडली.
बैठकीनंतर आ.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मनात काही प्रश्न होते,शंका होत्या. मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होतो. मात्र केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाने खा.सुजय यांना पुन्हा उमेदवारी दिली. मी भाजपचा निष्ठावान आणि खानदानी कार्यकर्ता आहे. मात्र मनात असलेले प्रशांची सोडवणूक होणे गरजेचे होते.
राम शिंदे पुढे म्हणाले की, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मी माझे सर्व मुद्दे मांडले. शेवटी मनात असलेल्या दुःख,अडचणी,प्रश्न नेतृत्वाने ऐकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि आपले म्हणणे ऐकून घेतले जात असेल तर नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. आता निवडणुकीला जास्त काळ राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारसौ पारचा नारा दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या समोर अडचणी मांडल्या, त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. माझ्या सर्व अडचणी-प्रश्नांचे निराकरण झालेले आहे. नेतृत्वाने आदेश दिलेला आहे, त्यामुळे नगर दक्षिणेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच झाला पाहिजे त्यादृष्टीने मी पूर्ण ताकतीने काम करणार आहे. तसा निर्णय मी घेतलेला आहे अशी ग्वाही आ.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.