नगर:
भारतीय जनता पक्षाने कधी नव्हे ती यंदाची 2024ची लोकसभा निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली आहे. “अब की बार चारसौ पार”चे उद्दिष्ट एनडीएचे ठरलेले आहे. यात भाजपने 370 तर मित्रपक्षांचे असे मिळून चारशेच्या पुढे खासदार निवडणुन आणण्याचा चंगच बांधला आहे. यासाठी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांचा आणि त्यांच्या चेहऱ्याचा वापर करत “मोदी गॅरंटी” यावर मोठा भर देत लोकसभा निवडणूक ही भाजप पक्ष म्हणून कमी आणि नरेंद्र मोदी म्हणून अधिक या पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखलेली दिसून येत आहे.
ही रणनीती यशस्वी करण्यासाठी आणि चारशे पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी अधिकाधिक जागांवर उमेदवार भारतीय जनता पक्षाचे असतील तसेच मित्र पक्षांना जागा सोडताना कमी जागा आणि निवडून येण्याची शाश्वती असलेल्या उमेदवारांनाच मैदानात उतरवण्याचे धोरण दिसत आहे. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवाराला भाजप कडून मैदानात उतरवून मोदी नावाचा “बुस्टरडोस” देण्याचे घाटत आहे. जागा वाटपाचा तिढा त्यामुळेच वाढला असून उमेदवारांची घोषणा युती असलेल्या राज्यात खोळंबलेली आहे.
भाजपच्या चारशे पेक्षा अधिक जागा जिंकायच्याच हे उद्दिष्ट असल्याने यंदा भाजप कडून उमेदवारी देताना प्रयोग करण्याचे टाळले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विद्यमान खासदार असलेल्या जागांवर नवीन उमेदवार न देण्याचे संकेत स्पष्ट दिसून येत आहे. मित्र पक्षाच्या जागा आपल्याकडे घेत अशाच ठिकाणी किंवा ज्या जागांवर 2019 ला भाजपचा पराभव झाला अशाच ठिकाणी धक्कादायक निर्णय घेत नवीन चेहरे देण्याचे ठरले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
काही ठिकाणी मंत्र्यांना मैदानात उतरवण्याचे ठरले असले तरी यात सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट नकार असल्याचे दिसून आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नावही खा.सुजय विखे यांना पर्याय म्हणून चर्चेत आले होते. मात्र त्यात तथ्य नसल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. नगर दक्षिणेतून आ.राम शिंदे यांनीही उमेदवारी पक्षाकडे मागितली असली तरी केंदीय नेतृत्व चारसौ पारचे उद्दिष्ट असल्याने नगर दक्षिणेत रिस्क घेण्यास तयार नाही. जिल्ह्यात आणि राज्यात विखे यांचे मोठे स्थान आहे. एक मोठी यंत्रणा ते निवडणुकीसाठी वापरत असतात. 2019 ला सुजय विखे पहिल्यांदाच उमेदवारी करत असताना आणि त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात नुकताच प्रवेश केलेला असतानाही मिळवलेला विजय ही किमया विखेच करू शकतात हे पुन्हा स्पष्ट झाले. या परिस्थितीत राज्यात आणि जिल्ह्यात काहीही चर्चा सुरू असली तरी भाजप केंद्रीय नेतृत्व विखे परिवारासोबत असून कुठलाही धोका नको म्हणून सुजय विखे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे.
राज्यात भाजपकडून मुनगंटीवार, आशिष शेलार,प्रवीण तावडे,पंकजा मुंडे अशी अनेक नावे लोकसभेसाठी पुढे येत असली तरी यातून आता मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव गायब झाल्याने आणि चारसौ पार साठी विद्यमान खासदारांच्या जागेवर प्रयोग न करण्याचे ठरलेले असल्याने खा.सुजय विखे यांचा दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. सध्या खा.सुजय विखे यांनी एकीकडे मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यात महिला वर्गाला टार्गेट करत आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि बक्षिसांची लयलूट सुरू आहे. स्वतः सुजय विखे उमेदवारीवर चकार शब्द बोलत नसून सांस्कृतिक कार्यक्रमात “में हु डॉन..” गाण्यावर डान्स करत आनंद घेत चर्चेत राहत आहेत. त्यामुळे विरोधकांत तिकीट कापाकापीची नुसतीच चर्चा माध्यमातून आणण्यासाठी खटाटोप सुरू असला तरी सुजय विखे यांच्या भाजप उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.