नगर:
राज्यातील महायुतीचा फॉर्म्युला जवळपास अंतिम झाला असून दिल्लीत अंतिम निर्णय होणार असून आजच भाजपच्या जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 12 ते 15 उमेदवार घोषित होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. भाजपने 48 पैकी 30 जागा आपल्याकडे घेतल्या असून शिवसेनेला(एकनाथ शिंदे गट) 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसला(अजित पवार गट) 7 जागा अंतिम झाल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजप केंद्रीय नेतृत्वाने भाजपसाठी 35 ते 38 जागांचा प्रयत्न होता. तर मित्र पक्षासाठी केवळ 10 ते 13 जागा सोडण्याचा प्रयत्न केला जात होता. यात अजित पवार गटाला केवळ तीन ते चार जागांवर समाधान मानावे लागणार होते. मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी भाजप नेतृत्वावर दबाव कायम ठेवला, परिणामी दिल्लीत अनेक बैठका होऊनही जागावाटप अडून राहिले होते. आता भाजपने काहीसे नमते धोरण घेत आणि चारशेच्यावर जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याने मित्र पक्षांना काहीसे खुश करत जागा वाढवून देण्यास मान्यता दिली आहे.
या नुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 11 जागांची अपेक्षा असली तरी त्यांना तीन वरून सात जागा तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना 18 जागांची अपेक्षा असली तरी एक आकडी संख्येवरून 11 जागा देण्याचे मान्य केले आहे. आज दिल्लीत महाराष्ट्रातील जागावाटपावर अखेरची बैठक होऊन भाजप 30, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी 7 असा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
दरम्यान आजच भाजप देश पातळीवर उमेदवारांची दुसरी यादी घोषित करणार असल्याचे आणि यात महाराष्ट्रातील 12 ते 15 उमेदवारांची नावे घोषित होणार असल्याची माहिती मिळत आहे. यात नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी या जागांपैकी नगर दक्षिणेच्या नावाची घोषणा होणार असल्याचे समजते आहे. विद्यमान खा.सुजय विखे यांच्या बद्दल विविध पातळीवर चर्चा होऊन आणि पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या विद्यमान खासदारांच्या यादीत सुजय विखे यांचे नाव अंतिम झाल्याने आज जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
ज्या मतदारसंघात पुन्हा निवडून येणाची खात्री असलेल्या विद्यमान खासदारांची नावे आज जाहीर होणाऱ्या यादीत असणार असून यात खा.सुजय विखे यांचे नाव असू शकते. खा.सुजय विखे यांनी गेल्या वर्षभरापासूनच विविध विकास कामांचा शुभारंभ ज्यात नगर शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल, बायपास-रिंगरोड, रिंगरोडवरील ओव्हरब्रिज, नगर पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती, नगर एमआयडीसी, वयोश्री योजना आदींसाठी मोठे कार्यक्रम घेतले. साखर-शिदा वाटप आणि सध्या सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका पाहता खा.विखे यांनी आपली उमेदवारी अगोदरच गृहीत धरून एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केलेली आहे. स्वतः खा.विखे आपल्या उमेदवारीवर जाणीवपूर्वक भाष्य करत नसून विरोधात असलेले संभाव्य उमेदवाराच्या बाबतीत टीका टाळत आहेत. स्वपक्षीयतील इच्छुकांवरही त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
दुसरी कडे कांदा प्रश्नावर दिल्लीत अमित शाहा यांची विखे पिता-पुत्रांची भेट ही नेमकी कशासाठी होती हे ही लपून राहिलेले नाही. एकंदरीत केंद्रीय शीर्ष नेतृत्वाच्या संपर्कातून मिळालेल्या उमेदवारीची संदिग्धता संपल्यानेच सुजय विखे यांनी विरोधकांवर टीका न करता आणि उमेदवारीवरील भाष्य टाळत विविध कार्यक्रमांचा धडाका कायम ठेवत एक प्रकारे प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव असण्याची दाट शक्यता मानली जात आहे.