जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण ):
जामखेड – रत्नदीप मेडिकल फौडेशन संस्थेच्या आवारात जखमी हरीण सापडले याबाबत वनविभागाने जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचार केले. सदर हरीण संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनीच पाळले असल्याचे वनविभागाच्या तपासात आढळून आले यामुळे वनविभागाने १९७२ वन्यजीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. चार दिवसात डॉ. मोरे याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी माहीती दिली की, दुपारी एकच्या सुमारास माहिती मिळाली की, जामखेड कर्जत रस्त्यावरील रत्नदीप मेडिकल कॉलेज च्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरीण आहे. त्यानुसार सहायक वनसंरक्षक गणेश मिसाळ राहुरी, दक्षता पथक डि एम बडे, बी एस भगत वनरक्षक प्रवीण उबाळे, रवी राठोड, शांतीनाथ सपकाळ, नागेश तेलंग यांचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झालो. पत्र्याच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरीण आढळून आले.
सदर हरणाला जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांनी उपचार करून सदर हरीण डोणगाव येथील नर्सरी येथे ठेवले. याबाबत तपास चालू केला असता काही व्हिडिओ व फोटो आढळून आले ते रत्नदीप संस्थेच्या आवारात दिसून आले तसेच ते संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी पाळले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली. हरीण पाळण्याची परवानगी नसताना ते पाळण्यात आले त्यामुळे रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या वर १९७२ च्या वन्यजीव नियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
