नगर:
घोळक्यातला एक शिवसैनिक.. पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक.. हातात भगवे शिवबंधन!! किडमीडित शरीर यष्टी.. पण चेहऱ्यावर एक तेज..करारीबाणा आणि जोडीला अभ्यासूवृत्ती. अखंड 24 तास सामान्य जनता,शेतकरी, युवक,कामगार यांच्या साठी धावपळ!! या अंगी जन्मजात निरपेक्ष भावनेतून आलेल्या वृत्ती-गुणांमुळे शिवसैनिक असलेले निलेश लंके शिवसेनेचे तालुका प्रमुख झाले.
या पदावर त्यांनी काम करताना हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करत शिवसेना तालुक्यात गावागावांत पोहचवली. निलेश लंके काम करत गेले..इतरही अनेक पदाधिकारी काम करतातच मात्र निलेश लंकें कडे होती ती निरपेक्ष भावना!! राजकारण हा समाजसेवा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. केवळ सत्ता आणि पैसा असे गणित राजकारणात आलेल्यांच्या डोक्यात असते. मात्र या बाबाच्या डोक्यात फक्त जनतेची सेवा, त्यांचे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी कसलीही पर्वा न करता आणि वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवत असलेला आक्रमकपणा..

जनता जेव्हढी भूलथापा मारणाऱ्या पुढाऱ्यांच्या आहारी जाते तेव्हढीच हीच जनता जेंव्हा एखादा नेता निरपेक्ष भावनेने धडाडीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतो, व्यवस्थेशी भांडतो.. अंगावर गुन्हे दाखल होओ, पोलिसांचा त्रास होओ आणि प्रसंगी स्वकीयांकडून पाय खेचण्याचा प्रकार होओ, तरीही 24 तास सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर उभा राहतो आणि आधार देतो, अशा नेतृत्वाची पारख पण जनतेला असतेच.
याच वृत्तीने काम केलेले आणि जनतेचे “नेते” झालेले निलेश लंके यांच्या नशीबात नियतीने एकीकडे संघर्ष लिहलेला असला तरी दुसरीकडे “राजयोग”ही लिहून ठेवलेला आहे. कर्म कर फल की अपेक्षा मत कर.. या वृत्तीने काम केलेले निलेश लंके 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लीलया विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आणि नेते निलेश लंकेंचे आमदार निलेश लंके झाले!!
आमदार होऊन निलेश लंकेंना आता पाच वर्षे लवकरच पूर्ण होतायत.. अनेक विकासकामे त्यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात या दरम्यान केलीत. गेल्या आठवड्यातच त्यांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी सरकार कडून आणला.. सध्या नेते नेमके कुठे? कोणत्या पक्षात?? लोकसभा लढवणार का? अशी चर्चा सुरू आहे.. माध्यमातून बातम्या रोज बरसत आहेत.
पण नेते या बातम्यांच्या गावी नाहीत तर जनतेच्या सेवेत आहेत. विषय त्यांच्या राजकीय भवितव्याचा जरूर असेलही पण त्याची चिंता नेत्यांना नाही.. कारण त्यांनी केलेले राजकारण हे समाजकारणाशी निगडित आहे. आणि जर असे आहे तर समाज पाठीशी असतोच. या परिस्थितीत जनतेचे नेते अर्थात आ. निलेश लंके लोकसभा लढवणार.. किंवा लढवणार नाहीत.. बरं लढवलीच तर ती कोणत्या पक्षाकडून असे अनेक प्रश्न काहींना असतीलही.. पण हे प्रश्न ना निलेश लंके यांच्या चेहऱ्यावर आहेत ना नेत्यांना मानणाऱ्या जनतेच्या मनात!!
उद्या जो निर्णय नेते घेतील तो स्वतःसाठी नव्हे तर आपल्या जनतेसाठीच घेतील ही भावना नेत्यांच्या चाहत्यांच्यात आहेत.. त्यामुळे आज सामान्यांचे नेते आमदार नितेश लंके यांचा वाढदिवस चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण असून नेत्यांना उदंड..निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशीच आशीर्वादरुपी भावना पारनेर-नगर मतदारसंघातील जनतेत आहे याबद्दल शंका नसावी..