राहुरी(प्रतिनिधी श्रीकांत जाधव):
गाव-गाव पातळीवर अनेक गरजेची विकास कामे काही न काही कारणाने प्रलंबित राहतात. यातून स्थानिकांना वर्षोनुवर्षे रोजच त्रासाला आणि गैरसोईला सामोरे जावे लागते. मात्र कधीतरी प्रलंबित असलेल्या कामाला मंजुरी मिळते..निधीची तरतूद होते आणि ज्यांच्या प्रयतानातून काम मंजूर झाले अशा मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कामाचे भूमिपूजन होत कामाला शुभारंभ होतो. मात्र याच कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात कधीकधी मान्यवरांना स्थानिकांची नेमकी कशी आणि किती अडचण होत होती याचीही प्रचिती अनायासे येते. असाच अनुभव राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही राहुरी तालुक्यातील एका मंजूर पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आला आणि त्यांना चक्क मोटारसायकलवर बसून कार्यक्रमस्थळी जावे लागले. मात्र पालकमंत्र्यांनी पण न लाजता हा केलेला बाईक सवारी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
त्याचे असे झाले की राहुरी- श्रीरामपुर तालुक्याला जोडणारा कान्हेगाव-लाख रस्त्यावरील पुलाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळत निधीची तरतूद झाली आणि या पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अर्थातच त्यांच्या हस्ते काल(9 मार्च) संपन्न झाला. 12 कोटी रुपये खर्चाचा हा पूल असून यासाठी पढेगाव,लाख,कान्हेगाव, लाडगाव आदी अनेक गावांनी स्थापन केलेली कान्हेगाव-लाख पूल कृती समिती आग्रही होती. परिसरातील नागरिकांना पूल नसल्याने अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर राहुरी-श्रीरामपूर तालुक्याला जोडणाऱ्या या रस्त्यावरील पुलाला मंजुरी मिळत कामाचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या निमित्ताने भूमिपूजन आयोजित केलेल्या कार्यक्रम स्थळी येण्यासाठी मंत्री विखेंच्या ताफ्याला पूल नसल्याने वेळ लागणार होता. अशा वेळी कार्यक्रमास उशीर नकोय, परिसरातील नागरिक आपली वाट पहात असल्याने त्यांना जास्त काळ ताटकाळायला नकोय म्हणून पालकमंत्री विखे यांनी चक्क एका युवकाच्या मोटारसायकलवर बसून कार्यक्रमस्थळी पोहचणे पसंत केले. राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील मोठे नाव असून सत्तेत तिसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे महसूलमंत्रीपदी ते आहेत, तसेच जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे अचानकपणे राधाकृष्ण विखे यांना युवकाच्या दुचाकीवर बसून कार्यक्रम स्थळी येताना पाहून अनेकजण काहीसे आश्चर्याने आणि काहीसे कौतुकाने त्यांच्या कडे पाहताच राहिले. यावेळी विखेंच्या सुरक्षेसाठी असलेले ताफ्यातील पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांना विखे बसलेल्या मोटारसायकलच्या मागे धावत पळत यावे लागले. अनेक उत्साही ग्रामस्थांनी यावेळी त्यांच्या बाईक सवारी मागे गर्दी केली. विखेंनी बाईक सवारीचा आनंद घेतला असला तरी यानिमित्ताने त्यांनाही स्थानिकांना पूल नसल्याने परिसरातून रोज येणाऱ्या अडचणीचा आणि कराव्या लागणाऱ्या कसरतीचा अंदाजही नक्कीच आला असणार.