नगर:
आ.राम शिंदे यांनी निदर्शनास आणल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची, शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाई प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले असतांना अद्याप कारवाई झाली नसल्याने आ. राम शिंदे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर चांगलेच संतापले असून मंगळवारी(20 फेब्रुवारी) आमदार शिंदे जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचे पत्रच त्यांनी धाडले आहे. विशेष म्हणजे आमदार राम शिंदे हे सत्तेतील भाजपाचे विधान परिषद सदस्य तसेच राज्याचे माजी मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत. मात्र असे असताना पालकमंत्री विखे यांनी राम शिंदे यांच्या तक्रारीवरून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कसलीही कार्यवाही न झाल्याने आमदार राम शिंदे आता संतापले असून त्यांनी थेट उपोषणाचा इशारा दिलेला आहे. ही एक प्रकारे राज्यातील महायुती सरकारला चपराक मानली जात असून प्रशासन पालकमंत्री, आमदार यांच्या मागणी आणि आदेशाला कशी केराची टोपली दाखवत आहे हे दर्शवणारे असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत आ.राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात,
“उपरोक्त विषयी नमुद करण्यात येतं की, सिना डॅम निमगांव गांगर्डा, ता.कर्जत, जि. अहमदनगर येथील येणाऱ्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्यावावत वेळोवेळी मागणी करुन देखील श्री. किरण देशमुख, कार्यकारी अभियंता कुकडी विभाग, क्र.२. ता.श्रीगोंदा यांनी दिशाभूल करुन खोटी उत्तरे दिली व पाणी शिल्लक असतांना देखील शेतकन्यांना वेठीस धरुन आवर्तन न सांडता जनतेच्या मनात शासनाविरोधात संताप निर्माण होईल व शेतकऱ्यांचे कधीही न भरुन निघणारे अतोनात नुकसान केले असे कृत्य केलं. तसेच नियमात नसतांना देखील वेकायदेशीररित्या परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून वेळ काढूपणा केला.
त्यामुळे मी सदरचा प्रश्न उपस्थित केल्याने मा. पालकमंत्री यांनी दि.१२.०२.२०२४ रोजी जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत संबंधित अधिकारी श्री. किरण देशमुख, कार्यकारी अभियंता यांचेवर निलंबन व शिस्तभंगविषयक कारवाई करण्यावावत निर्देश दिले.
निमगांव गांगर्डा येथील ग्रामपंचायतीने तलाठी कार्यालयाची इमारत बांधकामासाठी आपल्या कार्यालयाकडे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याबावत २ वर्षापुर्वी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने मा. पालकमंत्री महोदयांनी सदर वाव ही गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून आल्याने संधितांवर दप्तर दिरंगाई झाले असल्याचे स्पष्ट होत असून कारवाई करण्यात यावी यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करतो असे उत्तर दिले.
त्यामुळे श्री. किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, कुकडी विभाग, क्र.२. श्रीगोंदा यांच्यावर तात्काळ सेवा निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच निमगांव गांगर्डा येथील तलाठी कार्यालय इमारतीबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने व दप्तर दिरंगाई झाली असल्याने संबंधितांवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने मी दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ रोजी आपल्या दालनाबाहेर
सकाळी ११.०० वाजल्यापासून बेमुदत उपोषणास वसणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. उपरोक्त होणाऱ्या परिणामास जिल्हाधिकारी व शासन जवाबदार राहील, याची कृपया नोंद घ्यावी.” असे नमूद केले आहे.
या पत्राची प्रत आ.प्रा.राम शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास तथा पालकमंत्री, अहमदनगर यांना माहितीस्तव पाठवली आहे.
