छत्रपती संभाजीराजेच्या भूमिकेत खा. डॉ. अमोल कोल्हे
नगर(प्रतिनिधी):
खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नीलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने दि.1 ते 4 मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता नगर शहरात आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकारांच्या भेटीला येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आ.लंके यांनी केले. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार राजन बाने हे औरंगजेबाची भूमिका निभावणार आहे. सोबतच स्नेहलता वसईकर, महेश कोकाटे, विश्वजीत फडते, अजय तापकीरे, रमेश रोकडे इत्यादी सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात असणार आहे. दीडशेहून अधिक स्थानिक कलाकार या महानाट्यात विविध भूमिका साकारणार आहेत.
तडाखेबाज संवाद, १२० फुट भव्य दिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे, बैलगाड्या, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर आणि दीडशेहून अधिक कलाकारांचा सहभाग या महानाट्यामध्ये असणार आहे.
स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हे महानाट्य पहावे असे आवाहन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
जगदंब क्रिएशन व महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शनच्या स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या ऐतिहासिक महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडीक हे असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
2 तास 40 मिनिटांचे महानाटय!!
-शंभू चरित्राचा वेध घेणारे शिवपुत्र संभाजी हे एकमेवाव्दितीय महानाटय २ तास ४० मिनिटांचे आहे. महानाटयामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्तथरारक घोडेस्वारी पहावयास मिळणार आहे. महानाट्यासाठी 150 फुट लांब, 80 फुट रूंद तसेच 5 मजली किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृतीचा 67 लाख रूपयांचा सेट लावण्यात येणार आहे. महानाटयासाठी 20 लाख रूपयांची आकर्षक, राजेशाही ड्रेपरी, 4 लाख रूपयांची शस्त्रास्त्रे आणि युध्द साहित्य वापरण्यात येणार आहे.
अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा:
-महानाटयामध्ये नेत्रदिपक आतिषबाजी आणि अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांन अनुभवण्यास मिळणार आहे. अत्याधुनिक प्रकाश योजना, थेट प्रेक्षकांमधून गनिमी काव्याने केल जाणारी बुन्हाणपूर मोहीम हे देखील या महानाट्याचे आकर्षण असणार आहे.