नगर:
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी वर्गातून आरक्षण मिळावे या मागणी साठी अंतरवली सराटी इथे मनोज जरांगे पाटील आंदोलने, उपोषण करत आहेत.
मात्र सरकार जरांगे यांच्याशी बोलणी करत असले तरी जरांगे यांच्या मागणी प्रमाणे आरक्षण देऊ शकलेले नाही. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र कायद्याच्या चौकटीत बसेल आणि न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यावे लागेल यासाठी प्रयत्न सुरू असल्याची सरकारची भूमिका आहे. मात्र जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी मधून केलेल्या मागणीवर ते ठाम असून आज 20 जानेवारी पासून ते मुंबईला पाई मोर्चा सुरू करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज पाई मोर्चाला सुरुवात करण्या पूर्वी जरांगे यांनी मोठा निर्णय घेत असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
आपण आज 20 तारखे पासून मुंबई कडे निघणार असून मी वाटेवरच उपोषण सुरू करण्याचे ठरवले आहे. याबाबत समाजाशी चर्चा करू असे म्हंटले आहे. सरकार निर्दयी आहे, मराठ्यांची मुले लढत आहेत, मरत आहेत, पण सरकारला मराठा समाजा बद्दल कीव येत नाही, आमची परीक्षा सरकार पहात आहेत.. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. यावेळी त्यांना रडू कोसळले, त्यांना बोलणेही अवघड होतं होते. मात्र आज सकाळी मुंबई कडे निघणारच, सरकारने ही वेळ आणलीय असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील मुंबईला पोहचण्या अगोदरच वाटेतच उपोषण करत पाई मुंबई कडे निघणार असल्याचा इशारा दिल्याने आंदोलनाची धार आज पासूनच वाढणार असल्याने सरकारची चिंता वाढवणारी आहे.