Latest news
नगर शहरात खळबळ! पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड!! आरोपी,सूत्रधार शोधा..एमआयएमचे डॉ.परवेज आश्रफी यांच... सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, आंबेडकरी नेते अशोक गायकवाड लाचेच्या गुन्ह्यात.. अखेर भंडारदरा धरण भरले.. 12 हजार 231 क्यूसेक्सने विसर्ग छ.संभाजीनगरच्या वाळुंज मधील बनावट नोटांचा कारखाना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आणला उघडकीस.. छत्रपती संभाजीनगर कडे जाताय सावधान!!कार मधून सोडण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणारे आरोपी गुन्हे शा... गुन्हे शाखेची मोठी कामगिरी..चौदा लाखांची चांदी जप्त..सोनाराचे दुकान फोडणारे चारजण जेरबंद.. खोट्या बलात्कार गुन्ह्याची चौकशी करून किरण काळे यांना न्याय द्या!! -विक्रम राठोड कही खुशी.. कही गम!! जामखेडात विजयी रॅली..तर संगमनेरात स्नेहमेळावा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत विखेंसह आ.संग्राम जगताप आणि.. मविआ सरकार आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील "या" चार जणांना हमखास मंत्री पदाची संधी
20.3 C
New York
Monday, August 25, 2025

सक्षम नेते.. पण आव्हान मनोमिलणाचे! ना.विखेंचे लागणार कसब!!

नगर(प्रतिनिधी):

राज्याच्या स्थापनेनंतर राजकारणात  कधी नव्हे ते एव्हढे उलटफेर 2019 ते आता पर्यंत  चार-साडेचार वर्षात पहावयाला मिळाले आहेत. अजूनही विधानसभा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत काही राजकीय भूकंप होणारच नाही याची शाश्वती कुठलाही भविष्यकार देण्यास धजावणार नाही. या काळात 25 पेक्षा अधिक वर्षाची शिवसेना-भाजप युती तुटली, तीन मुख्यमंत्री विराजमान झाले, फडणवीसांचे अनपेक्षित उपमुख्यमंत्री पदावर “डीमोशन”, अजितदादा तब्बल तीनदा उपमुख्यमंत्री झाले, सत्तेतले विरोधात तर विरोधातील सत्तेत, तर काही महारथी सत्तेतून सत्तेतच राहिले..मंत्री झाले!! या सर्व पार्श्वभूमीवर वर गेल्या चार पेक्षा अधिक वर्षातील राज्यातील राजकारणाचा परिपाक म्हणजे राज्यात सध्या अस्तित्वात आणि सत्तेत असलेली महायुती सरकार.

महायुतीत महादिग्गज नेते..
-या युती-महायुती  सरकार मध्ये सुरुवातीला शिवसेना फोडून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे, 2019 ला सर्वाधिक 105 आमदार असलेल्या भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री आणि अनपेक्षित आणि मोठा धक्का देत राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाला सोबत घेऊन आलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच टर्म मध्ये तीन वेळी उपमुख्यमंत्री आणि इतर छोट्या घटक पक्षांचे आमदार या “महायुती” सरकार मध्ये आहेत.

- Advertisement -

“इंडिया” विरोधात “महायुती” अशीच लढत:
-जवळ आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षात “इंडिया” आघाडीची रणनीती सुरू असताना आणि मधल्या काळात महाविकास आघाडीच्या एकत्रित अनेक जाहीर सभांमधून विरोधकांनी एकीची मोट बांधत त्यात “वंचित” राहिलेल्या इतर पक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरी कडे राज्यातील एक मूळ पक्ष तर दोन इतर पक्षातून नव्याने पूढे आलेले पक्ष वा गट यांच्यात सरकार म्हणून “सरकार आपल्या दारी” कार्यक्रम होत असले तरी त्यात सरकार म्हणून मोजक्या नेत्यांची एकी आहे. मात्र कित्येक वर्षे एकमेकांच्या विरोधात थेट किंवा युती आघाडी असली तरी कुरघोडी करत राजकारणात असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांचे मनोमिलन झाले का? हा प्रश्न असून हे मनोमिलन व्हावे या कल्पनेतून काल 14 जानेवारीला राज्यभर 36 जिल्ह्यात महायुती मधील प्रमुख तीन पक्ष आणि इतर छोट्या अनेक घटक पक्षांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला.

महायुतीत लोकसभा पुढे विधानसभेला काय??
-आता राज्यभर हे मेळावे झाले असले तरी  राज्यभरातून ज्या बातम्या येत आहेत त्यात दोन गोष्टी प्रामुख्याने सामोऱ्या येत असून त्याची झलक नगर मधील महायुतीच्या मेळाव्यातून नक्कीच दिसून आली असे म्हणावे लागेल. यातील पहिली गोष्ट म्हणजे महायुती मधील वर्चस्व असलेल्या भाजप, शिवसेना(एकनाथ शिंदे गट),राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार आणि राज्यात वर्चस्व असताना प्रहार जनशक्ती, आरपीआय आठवले, शिवसंग्राम आदी छोट्या पक्षांचे स्थान काय, त्यांना उमेदवारीत वाटा किती आणि कुठे याची जाहीर वाच्यता पुढे आली आहे. तर प्रमुख तीन पक्षातीलच आमदार सोईनुसार आमचा लोकसभेला फक्त वापर करू नका, लोकसभा झाल्यानंतर आमच्या मागे महायुतीतील नेते असेच मागे असतील का?? याची शंका असून त्यापेक्षा लोकसभे बरोबरच विधानसभा निवडणुका घ्या म्हणजे आमचे काम सोपे होईल अशी स्पष्ट शब्दात मागणी केली गेली आहे. विशेष म्हणजे या मागणीला भाजप मधील विधानसभेचे संभाव्य किंवा इच्छुक उमेदवारही अपवाद नाहीत.

- Advertisement -

एकी ऐवजी दिसली बेकी!!
-मेळावा महायुतीचा असला तरी कोणी आप-आपल्या पक्षाचे तर कोणी आपल्या लाडक्या  नेत्याची ताकत दाखवण्याचा प्रयत्न नगर मधील मेळाव्यातून दिसून आला. अनेक नाराज आलेच नाहीत. जे आले ते कुठे सामुहिक शक्ती प्रदर्शन तर कोणी भाषणातून आपल्या पक्षाच्या शीर्ष नेत्याच्या गुणगान करण्याला प्राधान्य देताना दिसले. मेळाव्याच्या निमित्ताने काहींनी आपल्या नेत्याच्या उमेदवारीची प्रश्न सोडवण्याचा आणि पर्यायाने दावा दाखवणाचा प्रयत्न केला. हे सुरू असताना मेळाव्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना भाषण “कर्त्यांना” सूचना देण्याची वेळ आली.

घोषणांनाचा “संग्राम” आणि “प्रहार”!!
-वास्तविक महायुती म्हणून सर्व पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा चार पैकी एकही आमदार पालकमंत्री व्यासपीठावर आल्यानंतरही उपस्थित नव्हता. अखेर आ.संग्राम जगताप आले मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जगताप येत असताना त्यांच्या सोबत सभागृहात प्रवेश केला तो ही जोरदार घोषणाबाजी करतच. प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिजित पोटे यांचे पण उशिराचे आगमन त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत लक्षवेधी करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम स्थळी येतांना आपल्या पक्षाचाच पंचा नेते आणि कार्यकर्ते यांनी गळ्यात ठेवल्याचे ठळकपणे दिसून आले. कुणाला हा पंचा कमी पडू नये याची काळजी सगळ्यांनी आपापल्या परीने घेतली होती. तसेच हे कार्यकर्ते सभागृहाच्या बाहेर गटागटाने थांबून आपल्या नेत्यांची वाट पहाताना होते.

राष्ट्रवादी आमदारांची अनुपस्थिती चर्चेत!!
-महायुतीचा मेळावा घोषित झाल्यापासून नगर जिल्ह्यात एकच चर्चा होती आणि ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या आवेशात असलेले पारनेरचे लंके दांपत्य!! त्यामुळे महायुती धर्म म्हणून आ.निलेश लंके यांची उपस्थिती कडे अनेकांचे लक्ष होते. मात्र नगर शहरात असूनही  लंके दांपत्याने मेळाव्याकडे सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे अनुपस्थित होते तर भाजपच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची उपस्थिती लक्षवेधक राहिली. मात्र सध्या एकूणच कोपरगाव-राहात्याच्या राजकारणात चर्चेत असलेले विवेक कोल्हे मात्र अनुपस्थित होते. अकोल्यातुनही राष्ट्रवादीचे आ.किरण लहामटे आणि भाजपचे माजी आ.वैभव पिचड यांचीअनुपस्थिती बरेच काही सांगून जाणारी होती. महायुती मध्ये सध्या सात आमदार असताना  यातील राष्ट्रवादी-भाजपचे आजी-माजी आमदार अनुपस्थित असणे म्हणजे जिल्ह्यातील महायुती मधील एकूणच आपसी संबंध ठीकठाक नसल्याचे दर्शवणारे म्हणावे लागेल.

कर्डिलेंची अपेक्षा तर राम शिंदेंचा स्पष्टवक्तेपणा!!
-माजीमंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले मिश्किल भाषणासाठी सर्वश्रुत आहेत. जे काही मनात असते ते आपल्या खास मार्मिक पद्धतीने बिनधास्तपणे ते बोलत असतात. त्यांनी महायुती निमित्ताने तयार झालेल्या नव्या समिकरणावर स्पष्टपणे आपले मत मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत एकमेकां विरोधात लढलो, बर ज्यांच्या सोबत लढलो त्यांचे चेहरे मधल्या अनेक काळ पाहिलेले नाही. आता महायुती म्हणून एकत्र जरी येत असलो तरी हा दुरावा दूर होण्यास वेळ लागणार असे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या निमित्ताने आता मेळावा होत असताना पुढे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आमचे काय असा रोखठोक प्रश्न कर्डीले यांनी उपस्थित केला. लोकभेच्या उमेदवाराला सगळ्यांशीच संबंध ठेवून काम करावे लागते पण नंतर आमच्या मदतीला तुम्ही येणार का या प्रश्नाचे उत्तर त्यांनी, त्यापेक्षा लोकसभे सोबतच विधानसभा निवडणुका घ्या म्हणजे आम्हाला सोपे जाईल अशी मागणीच करून टाकली. आपल्या मिश्किल भाषेत त्यांनी केलेली मागणी हशा पिकवून जाणारी असली तरी त्यात तथ्य असल्याची कुजबुज कार्यक्रमस्थळी दिसून आली. दुसरीकडे माजीमंत्री आ.राम शिंदेंनी आपल्या भाषणात भाजपने अंगिकारलेले धोरण लक्षात घ्या आणि निवडणुकीला सामोरे जाऊन जो उमेदवार असेल त्याला निवडून आणा असे स्पष्ट केले. आता अनेकजण लोकसभा-विधानसभेची तयारीला लागले आहेत, शिफारशी-लॉबिंग सुरू असेल. पण कुणाला उमेदवारी मिळणार यापेक्षा ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी काम करावे लागेल असा गर्भित इशारा एक प्रकारे दिला. त्यासाठी त्यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका, तेथे मिळालेला विजय आणि विजयानंतर शीर्ष नेतृत्वाने मुख्यमंत्री निवडीत घेतलेले अनपेक्षित निर्णय समोर मांडत शाहा-नड्डा यांचे तंत्रज्ञान ओळखा असा सूचक इशारा सर्वच इच्छुकां देत एक प्रकारे कान टोचले.

विखे मूळ मुद्यावर “परफेक्ट” बोलले..
-महायुतीचा मेळावा का घेतला जात आहे आणि यातून काय अपेक्षित होते हे मेळाव्याचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुद्देसूदपणे आपल्या भाषणात स्पष्ट केले. त्यांचे भाषण म्हणजे एकूणच मेळाव्यास उपस्थित-अनुपस्थित सर्वच नेत्यांसासाठी महायुतीचा वस्तुपाठ देणारा असेच म्हणावे लागेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन टर्म केलेली विविध कामे, समाजातील विविध घटकांसाठी आणलेल्या आणि यशस्वीपणे राबवलेल्या योजना, अयोध्येतील श्रीराम मंदिरे, 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, पीकविमा, वाढलेला रोजगार, आरोग्याच्या व्यापक सुविधा, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले देशाचे महत्व आदी मुद्यांना विखे यांनी हात घालताना, एव्हढे सारे करून आपण ही सर्व कामे लोकांसमोर नेण्यास कमी पडत असल्याचे सुनावले. एखाद्या छोट्या मुद्यावर विरोधक टीका करताना मोठी प्रसिद्धी मिळते मग आपल्या सरकारने इतकी मोठी कामे केलेली असताना ती जनतेसमोर घेऊन जाणे गरजेचे आहे. आपणच आपल्या सरकारने केलेल्या कामांना जनतेसमोर घेऊन जाण्यास कमी पडत असल्याचे सांगताना आता महायुती म्हणून ही विकासकामांची जंत्री लोकांसमोर मांडण्याचे आव्हान कार्यकर्त्यांसमोर असल्याचे विखे यांनी आवर्जून सांगितले. विरोधक आपल्यासमोर तोकडे आहेत. ज्यांना आपले पक्ष आणि आमदार सांभाळता आलेले नाहीत ते विजयाची आशा ठेवून असताना आता आपण प्रत्येक्षात केलेल्या कामांना गावोगावी प्रसिद्धी देण्याचे काम करा, अशा सूचना पालकमंत्री विखे यांनी केल्या. एकूणच महायुती मध्ये वजनदार पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची संख्या वाढली असली तरी या सर्वांचा सुकाणू विखे यांच्या हातात असून महाविजयाच्या उत्तरायणाची नैय्या पार पाडण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: कॉपी करु नका | डायरेक्ट फोन करा