श्रीगोंदा (प्रतिनिधी): खा.सुजय विखे यांच्या सुविद्य पत्नी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे यांचे एका कार्यक्रमा निमित्ताने श्रीगोंदा नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. धनश्रीताईंची कार्यक्रमस्थळी येताना जंगी रोड शो झाला. कधी बैलगाडीत तर कधी चारचाकी वाहनातून येत असताना त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. खा. सुजय विखे यांनी एकीकडे अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने साखर वाटपाच्या कार्यक्रमांचा धडाका लावलेला असताना आता धनश्रीताई यांनी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा या नात्याने ग्रामीण भाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
महिलांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या:
-श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डी,सारोळा सोमवंशी,कॊरेगव्हाण,निंबवी कोडे गव्हाण,आरंणगाव,ढवळगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते तर माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. विखे यांनी ग्रामस्थांशी आपुलकीनेसंवाद साधत समस्यांची माहिती जाणून घेतली. रणरागिणी महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना मदतीचा हात देत त्यांच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी माजी जि प सदस्य दीनु काका पंधरकर,सचिन कतोरे,पुरुषोत्तम लगड यांच्यासह सर्व सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवतींच्या हाती प्रचाराची डोर!!
-लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवार अनेक असले तरी अद्याप पक्ष पातळीवर एकाही उमेदवारीची घोषणा कुठल्याही पक्षाने केलेली नाही. मात्र असे असले तरी नगर दक्षिणेत खा.सुजय विखे यांनी साखर वाटप कार्यक्रमांचा धडाका सुरू करून एक प्रकारे प्रचारात आघाडी घेतल्याचे बोलले जातेय. दुसरीकडे पारनेरचे आ.निलेश लंके दांपत्य लोकसभेसाठी इच्छुक आहे. आ.निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके यांनी मोहटादेवी गडावरून स्वराज्य यात्रा सुरू केली असून ही यात्रा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र फिरत आहे. आता धनश्रीताई विखे यांनी रणरागिणी महिला मंडळाच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला असून त्यांच्या कार्यक्रमांची जोरदार तयारी असल्याची चर्चा आहे. येणाऱ्या काळात धनश्रीताई विखे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन असल्याचे समजते.





