नगर:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज मंगळवारी संसदेमध्ये खासदार पदाची शपथ घेतली. लंके यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी इंग्लिश भाषेबद्दल आव्हान दिले होते. त्यामुळे आज खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेत एक प्रकारे माजी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले.
खासदार लंके यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली असली तरी शेवटी रामकृष्ण हरी म्हणत आपला वारकरी बाणा आणि महाराष्ट्राशी असलेलं नातं स्पष्ट केलं. खासदार निलेश लंके यांच्या शपथविधीची मोठी उत्सुकता नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला होती. निलेश लंके कधी शपथ घेतात याची आतुरतेने त्यांचे कार्यकर्ते चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. शपथविधी होताच त्यांच्या शपथविधीचे व्हिडिओ, फोटो समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नगर जिल्ह्यातीलच शिर्डी अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनीही शपथ घेतली. वाकचौरे यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली. नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे 2009 मध्ये शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आता 2024 ला पुन्हा एकदा ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडून आले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला.
खासदार निलेश लंके यांच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला अनेक दशकानंतर खासदार पद मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी शपथ घेताच पारनेर तालुक्यात एकच जल्लोष करण्यात येत आहे. शपथ घेण्यासाठी निलेश लंके यांच्यासोबत त्यांचे आई-वडील पत्नी सर्व कुटुंबीय दिल्लीमध्ये उपस्थित आहेत. अनेक जवळचे सहकारीही आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यासाठी निलेश लंके यांच्यासोबत गेलेले आहेत. नुकतेच निलेश लंके यांनी मुंबईत मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत.