नगर:
राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोर्यात सुरू आहे. शिक्षक आणि पदवीधर अशा चार जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राजकिय पक्षांसह अपक्षांनी उडी घेतल्याने तसेच महायुतीतील पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निवडणूक रंगतदार बनत चालली आहे. काही हजारात मतदार असले तरी मतदातसंघ अनेक जिल्ह्यातील मतदारांच्यात व्यापलेले असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी मोठी कसरत करताना दमछाक होत असते. पक्षाची ताकत असलेले उमेदवार आणि काही अपक्ष पण राजकीय मोठी पार्श्वभूमी असलेले उमेदवार असल्याने निवडून येण्यासाठी “नाना तर्हा” उमेदवारांना कराव्या लागत आहेत.
अशात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अधिकच रंगतदार आणि “घासून” होण्याची शक्यता असल्याने निवडून येण्यासाठी निवडणुकीत पूर्वी गाजलेला “पैठणीचा साज” पुन्हा एकदा शिक्षकांसमोर मांडला जात असल्याची चर्चा आहे. बरं हा “पैठणीचा साज” मांडताना “सोन्या”च्या “नथीतून” “बाण” मारला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. एक पैठणी आणि सोन्याची नथ असा नजराणा दिला जात असल्याची चर्चा आहे.
नाशिक भागातील निवडणूक आणि येवल्याचे मोठे नाते आहे. इथली पैठणी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. त्या मुळे कुणाला खुश करण्यासाठी नजराणा म्हणून पैठणी भेट दिली की काम फत्ते म्हणून समजा!! त्यामुळे निवडणुका आणि पैठणी असे घट्ट नाते मतदारराजाला माहीत असते आणि चाणाक्ष उमेदवार हे ओळखून असतो. आता कुजबुज चर्चे नुसार पैठणी सोबत “सोन्या”च्या नथीतून “बाण” मारून घायाळ करण्याचे काम सुरू आहे.
बरं या कुजबूजीत अजून एक ट्विस्ट ऐकायला येत असून “नथीतून” मारलेल्या “बाणा”चा सांगितलेला “भाव” प्रत्येक्ष “सोनाराने कान” टोचल्यावर वेगळाच असल्याने “उल्लू बनाया” अशीही भावना असली तरी उघड यावर बोलणार काय?? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एकंदरीत या गोष्टीची कुजबुज आणि चर्चा दबक्या आवाजात असून अद्याप कोणी उघडपणे बोलण्यास पुढे येताना दिसत नाही.
या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारांनी या निवडणुकीत पैशाचा वापर होत आमिष दिले जात असल्याबद्दल विचारले असता कोल्हे यांनी, निवडणूक म्हंटली की चुरस ही असतेच, आणि निश्चितपणे काही गैर प्रकार होत असतात. मात्र जनता मतदानरुपी उत्तर देऊन अशांना धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांच्या पत्रकार परिषदेत हिरालाल पगडाल यांनी या पूर्वीच्या निवडणुकांत पैठणी वाटल्या असल्याचे सांगितले होते. आता पैठणी सोबतच सोन्याची नथ भेट दिली जात असल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आहे.