फडणवीसांना स्वतः मोकळं व्हायचं की पक्षाला त्यांना मोकळं करायचंय!!
नगर:
“अब की बार ४०० पार..फिर एक बार मोदी सरकार” हा नारा घेऊन मोदी-शाहा,भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष मोठा गाजावाजा करत उतरले. मात्र एकूणच घोषित केलेला ४०० पार चा नेरेटिव्ह निकाल घोषित झाल्यानंतर भाजपवरच पुरता बूमरँग झाल्याचे स्पष्ट झाले. उलट भाजपने सेट केलेला नेरेटिव्ह विरोधकांनी, “संविधान बदलण्यासाठी ४०० पार” साठी असल्याचे सांगत हायजॅक केल्याचे पुढे आले. निकालावर प्रतिक्रिया देताना आता भाजपसह मित्र पक्षांचे नेते विरोधकांनी ४०० पार नार्याचा आधार घेत मतदारांच्यात चुकीचा नेरेटिव्ह सेट केल्याचे सांगणे भाग पडत आहे. सत्ताधाऱ्यांचा मुद्दा विरोधकांनी असा पलटवून लावला की येणाऱ्या विधानसभेसाठी सत्ताधारी धास्तावले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून राज्यातील महायुती मधील नेते संविधानाला कोणीही माय का लाल हात लावू शकत नाही हे दर्शण्यासाठी सरसावले आहेत.
मात्र या सर्व प्रक्रियेत लोकसभेला राज्यात भाजपला बसलेला मोठा फटका मोदी-शहांसाठी चिंतेचा विषय बनल्याने राज्यांत भाजप पक्ष संघटनेत मोठे फेरबदलाचा विषय ऐरणीवर आला आहे. निकाला नंतर चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी लागलीच घेतली. त्या बरोबरच आपण सरकार मधील उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला होऊन पक्ष संघटनेला पूर्ण वेळ देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले. वास्तविक राज्यातील आलेले निकाल पाहता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व आणि पक्ष संघटनेकडून तो पर्यंत तसे कुठलेही संकेत आलेले नसताना फडणवीस यांनी आपला निर्णय घोषित करून आपण चाणाक्ष राजकारणी असल्याचे दाखवून दिले.
काही वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले विनोद तावडे यांना राज्यातून दिल्लीत पक्ष संघटनेच्या कामासाठी हलवले गेले. तावडे दिल्लीत असले तरी ते मनाने महाराष्ट्रात घुटमळत होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या मर्जी शिवाय राज्यात परतणे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखून केंद्रात दिलेली जबाबदारी एक निष्ठने आणि “रिझल्ट ओरियेंटेड” सांभाळली. विरोधी पक्षातील अनेक नेते त्यांनी चलाखीने भाजपात आणले. त्यांच्या नजरेत भरणाऱ्या कामगिरीने तावडे आज मोदी-शाहांच्या जवळचे बनले आहेत.
लोकसभेच्या निकालानंतर प्राप्त परिस्थितीत भाजप मधील पक्ष संघटनेत अनेक फेरबदल केंद्रात आणि राज्यात होणार आहेत. काहींची मंत्रिमंडळात तर काहींचा कार्यकाळ संपल्याने पक्ष संघटनेत महत्वाचे फेरबदल होत आहेत. यात राज्यात प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष या पदावर नव्याने नियुक्त्या होणार आहेत. या दोन्ही पदावर नव्याने काम करण्यास अनेकजण इच्छुक असून त्यात देवेंद्र फडणवीस यांचेही नाव त्यांनी स्वतःच नियोजनबद्ध आणले आहे. लोकसभेच्या निकालानंतर एकूणच फडणवीस यांच्या बद्दल केंद्रीय नेतृत्व त्यांच्या २०१९ ते आता पर्यंतच्या कामगिरीचे अवलोकन करत आहे. शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठे खिंडार पाडण्या मागे देवेंद्र फडणवीस हेच होते हे पुढे आलेच आहे. मात्र या सर्व धाडसी प्रयोगानंतरही महायुती म्हणून जे परिणाम निकालाच्या माध्यमातून पुढे आले ते पाहता आता पक्षातूनच अनेक प्रश उपस्थित केले जात आहेत. आरएसएस कडूनही काही प्रतिक्रिया आल्या आहेत. एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर सरकार मजबुत स्थिर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना सोबत घेतल्याच्या निर्णयाला आणि अजित पवारांमुळे युतीला फायदा न झाल्याबद्दल फडणवीस यांच्या कडे तिरपा कटाक्ष आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका भाजपच्या उमेदवारांना काही मतदारसंघात बसला आहे. ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. या संघर्ष हाताळताना अनेकदा फडणवीस टार्गेट झालेले आहेत. हा प्रश्न त्यांना हाताळण्यात अपयश आले का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
या परिस्थितीत विनोद तावडे यांची वापसी राज्यात होऊ शकते. तशा दृष्टीने येणाऱ्या बातम्या खूपच सुचकपणे माध्यमातून पुढे आणल्या जात आहेत. तीन-चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका पाहता या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी दिल्लीत अमित शाहा, जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला ज्या नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे ते पाहता आजच्या बैठकीत बरेच काही महत्वाचे दिशादर्शक होणार असेच दिसत आहे. विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, चंद्रकांत पाटील यांना बैठकीस बोलावण्यात आले आहे. या बैठकीत मुख्यत्वे राज्याची धुरा कुणाकडे द्यायची याबाबत चर्चा वा थेट निर्णय होऊ शकतो. या सर्व घडामोडींकडे अर्थातच राज्याचे लक्ष असणार आहे.
विधानसभा निवडणुका पाहता राज्याला दोन प्रभारी:
-केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सहप्रभारी म्हणून रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून पाठवण्यामागे लोकसभा निवडणुकीतील पक्षाची पीछेहाट पाहता विधानसभेला तसा फटका बसू नये हा उद्देश असल्याचे दिसते. त्यामुळेच आज मंगळवारी दिल्लीत महाराष्ट्रा बाबत होणाऱ्या बैठकीस दोन्ही प्रभारी उपस्थित असणार आहे. गेली पाच वर्षे फडणवीस यांच्या हाती राज्यात “एकहाती” असलेल्या कारभार होता. आता यापुढेही तो तसाच राहणार की चर्चेत असलेल्या नावातून काही पर्याय पुढे आणले जाणार का? हेही आजच्या बैठकीतून पुढे येणार आहे.