गोपीनाथ मुंडेंनी शहरातील गुंडगिरी मोडीत काढली..आगरकरांचा सूचक रोख कुणाकडे!!
नगर:
पूर्वी युतीत असताना शिवसेनेसाठी 25 वर्ष आमदार राहिलेले अनिल भैय्या राठोड यांच्यासाठी आम्ही काम केले. त्यानंतर सुजय विखेंसाठी आम्ही शहरांमध्ये त्यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. यंदाच्या निवडणुकीतही सुजय विखेंचा पराभव झालेला असला तरी नगर शहरातून त्यांना मताधिक्य मिळवून दिले. या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभेसाठी अपेक्षा आकांक्षा असणे काहीही गैर नाही. आता आम्ही किती दिवस लोकांच्या पालख्या वाहायच्या?? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगर शहराची जागा मिळाली पाहिजे आणि यासाठी पंकजा मुंडे या योग्य आणि प्रगल्भ उमेदवार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केला आहे.
युती धर्म पाळल्याने राठोड 25 वर्षे आमदार!!
-अभय आगरकर यांनी दोन दिवसांपूर्वीच एक (जाहीर)पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले होते. त्यात त्यांनी नगर शहरातून युती असताना शिवसेना उमेदवाराला आणि आता महायुती उमेदवारासाठी मताधिक्य मिळत आलेले आहे हे सांगत, हे मताधिक्य नगर शहरातील भाजप संघटनेमुळे मिळत आलेले आहे असे स्पष्ट केले. पूर्वी युतीमध्ये असताना शिवसेनेचे (स्वर्गीय)अनिल राठोड हे सातत्याने 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने युती धर्मा पाळत त्यांना मोठी साथ दिली. मागील 2019 च्या निवडणुकीत आणि यंदा 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे यांना मोठी आघाडी मिळाली. त्यात भारतीय जनता पक्षाचे योगदान मोठे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातून भाजपचे उमेदवार असलेले सुजय विखे यांना 31 हजारांवर मतांची आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे नगर शहरात भाजपला पोषक आणि अनुकूल वातावरण असल्याचे आगरकर यांनी सांगितले.
शहरात भाजप मजबूत म्हणून..
-मात्र या सर्व कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाला 2014 वगळता नगर शहरातून संधी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता एकंदरीत गेल्या अनेक वर्षांचे नगर शहरातील मताधिक्य पाहता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिली जावी. नगर शहरातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विनासायास निवडून येईल अशी एकंदरीत राजकीय परिस्थिती असल्याचे आगरकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
स्व.गोपीनाथ मुंडेंनी नगरातील गुंडगिरी थोपवली!!
-नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा काही कारणास्तव पराभव झाला. त्यामुळे त्यांना नगर शहरातून पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केली असल्याचे आगरकर म्हणाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी नगर शहरातील गुंडगिरी मोडून काढण्याचा काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले असे मोठे विधान आगरकर यांनी करत असताना कुणाचेही नाव न घेता सूचक निशाणा साधला आहे.
पंकजा मुंडे प्रगल्भ नेत्या..
-पंकजा मुंडे ह्या प्रगल्भ नेत्या आहेत. त्यांच्या पाठीमागे मोठा राजकीय वारसा आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यावर विशेष प्रेम दाखवले आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा त्यांच्या पाठीशी असल्याने सर्व समाजाला सोबत घेत त्यांना त्या निवडून येतील आणि त्यामुळे नगर शहराचा विकास मोठ्या गतीने होईल असा दावा आगरकर यांनी केला आहे.
आता किती दिवस लोकांच्या पालख्या वाहायच्या??
-युती आणि महायुती धर्मपाळत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच इतर पक्षातील उमेदवारांना साथ दिली आहे. त्यामुळे आता किती दिवस इतरांच्या पालख्या वाहायच्या?? त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी बाबत आपल्या अपेक्षा व्यक्त करणे काही गैर नाही. कोणालाही राजकीय भवितव्य असते. राजकीय इच्छा आकांक्षा असतात. अशा परिस्थितीत सातत्याने लोकांच्या पालख्या वाहण्यापेक्षा आपला माणूस का नको? असा प्रश्न आगरकर यांनी उपस्थित करत आम्ही आमच्या पक्षाच्या शीर्षनेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. शेवटी आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मागणी करण्यात काहीही गैर नसल्याचे अभय आगरकर यांनी न्यूज नगरीशी बोलताना सांगितले.