नगर:
एकीकडे नगर शहरात महाविकास आघाडीत विधानसभा उमेदवारी वरून रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता असतानाच भारतीय जनता पक्षाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी जेष्ठनेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहरातून उमेदवारी द्यावी अशी विनंती वजा मागणी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून केली आहे. यामुळे शहरात गेली दोन टर्म अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप विद्यमान आमदार असताना आगरकर यांनी केलेल्या मागणीने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तसेच आगरकर यांच्या मागणीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची काय भूमिका पुढे येते याचीही उत्सुकता असणार आहे.
अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्य वतीने आपणास विनंती करणात येत आहे की, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांना अहिल्यानगर मधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट द्यावे.
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून लढवली तर त्या निश्चितच विजयी होतील. नुकत्याच झालेल्या लोककसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर शहरातून चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे. येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्षशील व लढवैय्या नेतृत्वाला जर नगर मधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील.
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी नगर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्या बरोबरच शहरातल गुंडगिरीलाही लगाम त्याकाळात घातला होता. त्यांचा कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. मुंडे परिवाराचे नगरशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना नगर शहरातून विधानसभा निवडणूकी साठी उमेदवारी द्यावी, अशी आपणास नम्र विनंती., अभय आगरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.