नगर:
लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त केलेले खासदार निलेश लंके यांचे नजीकचे विश्वासू सहकारी अडवोकेट राहुल झावरे यांच्यावर आज गुरुवारी सकाळच्या सुमारास पारनेर मध्ये काही लोकांनी हल्ला केला. पारनेर बस स्थानका समोरून राहुल झावरे आपल्या कारमधून(MH 14 DH 4786) जात असताना त्यांच्या कारवर काही लोकांनी दगडफेक केली. यात गाडीच्या काचा फुटल्या असून राहुल झावरे हे या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमलेला दिसून आला. पोलिसांना या घटनेची माहिती समजतात तातडीने मोठा पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. राहुल झावरे हे खासदार निलेश लंके यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान एकंदरीत सर्वच घडामोडीत त्यांचा निलेश लंके यांच्यासाठी सहभाग होता.
निवडणुकीची सर्व प्रकारची यंत्रणा राहुल झावरे यांच्या माध्यमातूनच राबवण्यात आली. तसेच निवडणूक प्रचार काळामध्ये विशेष करून पारनेर तालुक्यात निलेश लंके विरुद्ध विरोधात असलेल्या अनेकांसोबत वादविवादाचे प्रकार समोर आले होते. याबाबत काही तक्रारीही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. अटीतटीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव झाला आहे.
एकूणच राज्यात गाजलेली विखे विरुद्ध लंके ही लढत संघर्षमय झाली असून आता निकाल लागून निवडणूक संपली असली तरीही दोन्ही गटातील कार्यकर्त्यातील वाद सुरू असल्याचे या घटनेच्या निमित्ताने म्हणावं लागेल. हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत अधिकृत तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.
राहुल झावरे यांना अहमदनगरच्या सुरभी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल आहे , ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल.