तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितला संघर्षातून यशाचा मंत्र
राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नका, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा : डॉ.सुजय विखेंचे भावनिक आवाहन
संगमनेर : तुमच्यासाठी एमपीएससी-यूपीएससीची परीक्षा आहे, तर आमच्यासाठी निवडणुकीची परीक्षा आहे. तुम्ही एकदा अपयश स्वीकारून पुन्हा यश मिळवले, तसेच मीही लोकसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने तुमच्यासमोर उभा आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो. मात्र, सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील मुलांनी शिक्षणाच्या बळावर शासकीय सेवेत स्थान मिळवणे, यापेक्षा आनंदाचा दिवस माझ्या जीवनात दुसरा कुठलाही नाही,” असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील भगवतीमाळ-खंदरमळा येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमास आमदार अमोल भाऊ खताळ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र टाइम्सचे पुणे उपसंपादक प्रशांत काशिनाथ आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन जनार्दन आहेर यांनी केले. तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सामान्य कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेऊन चांगल्या पदावर पोहोचते, तेव्हा त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी उपस्थित राहणे मला नेहमीच आनंदाचे वाटते. कारण स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष हा सोपा प्रवास नसतो.
आज संघर्ष करून अधिकारी झालेली हीच मुले उद्या मोठ्या पदांवर पोहोचतील. आपल्या गावातील एखादा व्यक्ती मोठ्या पदावर गेल्यानंतर त्याचा फायदा केवळ त्याच्या कुटुंबाला होत नाही, तर संपूर्ण गावाला आणि समाजाला होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.
गावाच्या विकासाच्या मागण्यांसोबतच शाळांच्या पायाभूत सुविधांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. शाळांच्या खोल्या, संगणक, डिजिटल बोर्ड, मुलींसाठी स्वच्छतागृहे आणि शुद्ध पाण्याची सुविधा या मूलभूत गरजा असून त्याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. जोपर्यंत आपण आपल्या मुलांचा पाया मजबूत करत नाही, तोपर्यंत त्यांना उज्ज्वल भविष्य देता येणार नाही. त्यामुळे कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे आणि ती सुरुवात करण्याचा निर्णय आपण घेतला आहे,” असे ते म्हणाले.संगमनेर तालुक्यातील शाळांच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या पदांवर पोहोचू शकतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आपली मुलं शिकवा, मुलींना शिकवा आणि त्यांना समान संधी द्या. तुमची मुलं जेव्हा मोठी होतील, तेव्हा तुम्हाला गावातील कोणत्याही पदापेक्षा अधिक सन्मान मिळेल. सरपंच एकच होणार, आमदार एकच होणार, खासदारही एकच होणार; मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणातून निर्माण होणारे यश अनेक पिढ्यांना पुढे नेते,” असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
राजकीय स्पर्धेपेक्षा कुटुंब, मुलांचे शिक्षण आणि आई-वडिलांचे कल्याण यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करताना त्यांनी राजकारणासाठी कर्जबाजारी होऊ नये, असेही स्पष्ट केले. आपल्या मुलाबाळांच्या विकासासाठी आणि आई-वडिलांच्या कल्याणासाठी प्रथम काम करा,” असे ते म्हणाले.

